खुनाचा छडा लावणा-या पोलिसांना तीस हजाराचे बक्षिस.
पुणे-घोरपडे पेठेतील शिवाजी रोडवर 4 जून रोजी मध्यरात्री कचरू गणपत गवळी (वय-32) या इसमाचा अज्ञात आरोपीने चाकुचे वार करून खून केला होता. ही घटना मध्यरात्री घडली असल्याने पोलिसांना याप्रकरणी कोणतेही धागेदोरे मिळत नव्हते. तरीसुध्दा पोलिसांनी तब्बल 22 दिवस अहोरात्र मेहनत घेऊन अत्यंत क्लिष्ट अशा खुनाच्या गुन्ह्याचा छडा लावला असून यातील प्रमुख आरोपीला अटक केली. खडक पोलिसांच्या या कामगिरीचे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी कौतुक केले असून प्रशस्तीपत्रक आणि तीस हजार रुपये बक्षीस देऊन त्यांचा सन्मान केला.
मयत इसमाच्या मारेक-यांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले होते. आरोपींच्या शोधार्थ पोलिसांची चार पथके तयार करण्यात आली होती. तपासादरम्यान पुणे शहरातील बुधवार पेठ, शुक्रवार पेठ, शिवाजी रोड, स्वारगेट, सातारा रोड, बिबवेवाडी रोड आदी ठिकाणची 80 सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले होते. यामध्ये पांढ-या व काळ्या रंगाच्या डिओ स्कुटरवरून फिरणा-या एका व्यक्तीचा आणि मयताचा वाद झाल्याचे दिसून आले होते. त्यानुसार पोलिसांनी त्या व्यक्तीचा शोध सुरू केला.
यासाठी पोलिसांनी पुणे शहर आणि जिल्ह्यातील दोन हजार डिओ गाड्यांची माहिती गोळा केली आणि त्यातील निवडक 116 डिओ मोपेडच्या मालकांना बोलावून त्यांच्याकडे चौकशी केली. या चौकशीदरम्यान पोलिसांना एका संशयीत इसमाची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी अश्विन विकास गवळी (वय-19, रा.विघ्नहर्ताकूंज बिल्डींग, आंबेगाव पठार, कात्रज) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्याने पुर्ववैमनस्यातून कचरू गणपत गवळी याचा खून केल्याचे कबूल केले.
या क्लिष्ट खुनाच्या गुन्ह्याची उकल केल्याबद्दल पोलीस उपायुक्त बसवराज तेली यांनी खडक पोलिसांच्या पथकाला बक्षिस मिळावे यासाठी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याकडे शिफारस केली होती. त्यानुसार रश्मी शुक्ला यांनी खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संभाजी शिर्के, सहायक पोलीस निरीक्षक उमाजी राठोड, पोलीस उप निरीक्षक संजय गायकवाड, आनंत व्यवहारे पोलीस कर्मचारी सतिश नागुल, विनोद जाधव, बापु शिंदे, विश्वनाथ शिंदे, संदिप कांबळे, अशिष चव्हाण, अनिकेत बाबर, समीर माळवदकर, विनोद जाधव, इम्रान नदाफ, रविंद्र लोखंडे, गणेश सातपुते, सागर घाडगे, महेश कांबळे, तानाजी सरडे, राहुल जोशी यांचे कौतुक करून प्रशस्तिपत्र व तीस हजार रुपये बक्षिस देऊन सर्वांचा सत्कार केला.