आग्राः अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलेनिया ट्रम्प हे ताजमहालच्या प्रेमात पडले. ताजमहालच्या परिसरातील शांतता आणि ताजच्या सौंदर्याने ते भारावून गेले. ताजमहाल बघितल्यावर ट्रम्प यांनी तेथील पाहुण्यांच्या पुस्तकात आपले मनोगत लिहिले. ताजमहाल हा खरोखरचं प्रेरणादायी आहे, असं ट्रम्प यांनी म्हटलंय.
ताजमहाल प्रेरणादायी ऐतिहासिक वास्तू आहे. ताजमहाल काळाच्याही पलिकडे. ताजमहाल अतिशय सुंदर आणि भारतीय कला-संस्कृतिचा अप्रतिम नमुना आहे.
– डोनाल्ड ट्रम्प, अध्यक्ष, अमेरिका
अहमबादावरून निघालेले डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास आग्रा विमानताळवर उतरले. यावेळी उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर ट्रम्प हे पत्नी मेलेनिया, मुलगी इवांका आणि जावई कुशनरसोबत ताजमहालच्या दिशेने रवाना झाले. संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास ते ताजमहालमध्ये दाखल झाले.


मावळतीला आलेला सूर्य, थंड हवा आणि निसर्गरम्य वातावरण पाहून ट्रम्प ताजमहालच्या प्रेमात पडले. ट्रम्प यांनी संपूर्ण ताजमहल आणि आजूबाजूच्या परिसराचा फेरफटका मारला. ताजमहाल येथे फोटो काढण्याचा मोह ट्रम्प यांना आवरता आला नाही. त्यांनी पत्नी मेलेनियासोबत फोटोही काढले.

दुसरीकडे ट्रम्प यांची मुलगी इवांकाने पती कुशनरसोबत ताजमहाल बघितला. तिलाही ताजमहल आवडला. आयुष्यातील अतिशय सुंदर क्षण तिने पतीसोबत फोटोत कैद केला. तिनेही ताजमहाल परिसराचा पतीसोबत फेरफटका मारला.


