सातारा : कोयना प्रकल्पांतर्गत मंजूर पर्यटन विकासाची कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत, अशा सूचना राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.
कोयनानगर येथील चेंमरी विश्रामगृहात कोयना प्रकल्पाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. बैठकीस सातारा सिंचन मंडळाचे अधीक्षक अभियंता संजय डोईफोडे, पाटणचे उपविभागीय अधिकारी सुनील गाढे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी कीर्ती नलवडे, तसेच जलसंपदा, महसूल व पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी श्री. देसाई यांनी कोयना प्रकल्पातील कामांमधील अडीअडचणींचा आढावा घेतला. यामध्ये प्रामुख्याने प्रकल्पास उपलब्ध असणारा तुटपुंजा निधी, तांत्रिक-अतांत्रिक कर्मचाऱ्यांची कमतरता, तसेच शासन स्तरावरील प्रलंबित असणारे कोयना जलाशयातील बोटिंगसाठी प्रतिबंधित क्षेत्रामध्ये सुधारणा करणे, नवजा रस्ता हस्तांतरण इत्यादी बाबींचा आढावा घेतला. या प्रकरणांच्या निपटारा करण्यासाठी शासन स्तरावर ठोस पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
याचबरोबर कोयना प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमिनींचे वाटप करणे व नागरी सुविधा देणे विषयक कामांचाही आढावा घेऊन सदर कामांना गती देणेबाबत निर्देश राज्य उत्पादन शुल्कमंत्री श्री. देसाई यांनी दिले.
प्रारंभी राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी कोयना जलाशयातील पाण्याचे पूजन केले.