पुणे -महापालिकेमध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या ३४ गावांमध्ये महापालिकेची वैद्यकीय शहरी गरीब योजना राबविण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
रासने म्हणाले, या योजनेचा लाभ दारिद्र्य रेषेखालील पिवळे रेशनकार्डधारक, झोपडपट्टीत राहणारे नागरिक आणि ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येतो. हृदय, कॅन्सर, किडनी अशा आजारांसाठी उत्पन्न मर्यादा दोन लाख रुपये अशी आहे. शहरी गरीब योजनेच्या लाभार्थ्यांसाठी असणारे सर्व नियम समाविष्ट गावातील नागरिकांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी बंधनकारक राहणार आहेत. महिला आणि बालकल्याण समितीने या बाबतचा प्रस्ताव स्थायी समितीने सादर केला होता.
स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण केंद्र
महापालिकेचा समाज विकास विभाग आणि सावित्रीबाई फुले विद्यापीठ यांच्या संयुक्त सहकार्याने स्पर्धा परीक्षेला बसणार्या विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यास मान्यता दिल्याची माहिती हेमंत रासने यांनी दिली.
रासने म्हणाले, या योजनेअंतर्गत सावित्रीबार्इ फुले विद्यापीठाअंतर्गत केंद्रात विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणात प्रवेश देण्यासाठी लवकरच वर्तमानपत्रात जाहिरात देऊन अर्ज मागविण्यात येतील. अर्जदारांची निवड प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे. मागासवर्गीय गटातील शंभर आणि खुल्या गटातील पन्नास विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. प्रशिक्षणाचा कालावधी एक वर्षांचा राहणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण शुल्क प्रत्येकी सतरा हजार रुपये महापालिकेच्या वतीने भरण्यात येणार आहे. एका लाभार्थ्यास जास्तीत जास्त दोन वेळा लाभ घेता येईल. स्पर्धा परीक्षेला बसणार्या गरीब, हुशार आणि होतकरू विद्यार्थ्यांना या योजनेचा निश्चित लाभ होऊ शकेल.
ड्रेनेज लाइन्स, चेंबरची यांत्रिकी पद्धतीने साफसफाई साठी जेटिंग रिसायकलिंग मशिन सात वर्षांसाठी भाडेतत्वावर
शहरातील ड्रेनेज लाइन्स आणि चेम्बरची यांत्रिकी पद्धतीने साफसफाई करण्यासाठी अत्याधुनिक सक्शन कम जेटिंग रिसायकलिंग ही चार मशिन सात वर्षांसाठी भाडेतत्वावर घेण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती रासने यांनी दिली.
रासने म्हणाले. सध्या ड्रेनेज लाइन आणि चेम्बरची साफसफाई पारंपरिक पद्धतीने म्हणजेच सक्शन किंवा जेटिंग मशिनद्वारे केली जाते. यासाठी पाणी, वेळ आणि पैसा मोठ्या प्रमाणात वाया जातो. साफसफाई व्यवस्थित न झाल्याने वारंवार चोकप होण्याचे प्रमाण वाढते. नवीन मशिनमुळे पाण्याचा अपव्यय टाळता येईल, ड्रेनेज लाइन्स आणि चेंबरची साफसफार्इ व्यवस्थित होऊ शकेल. या यंत्रणेने काढलेला गाळ व पाणी सक्शन करून वाहनावर बसवलेल्या टाकीत फील्टर केले जाते. त्यामुळे प्रत्येक वेळेता फ्रेश पाण्याची गरज भासत नाही. त्यामुळे पाण्याची बचत होते. ही मशिनरी पुण्याजवळ इंदापूर येथे मेक इन इंडिया अंतर्गत विकसित करण्यात आली आहे. सध्या मुंबई, ठाणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, बंगलोर, चेन्नई, दिल्ली, पंजाब याठिकाणी वापरण्यात येत आहे. या शहरांच्या तुलनेत पुणे महापालिकेला प्रत्येक शिफ्टला येणारा खर्च ३८ हजार ७०० रुपये इतका सर्वात कमी आहे.

