पंतप्रधानांनी गुजरातमधील गांधीनगर येथील महात्मा मंदिर परिषद आणि प्रदर्शन केंद्रात संरक्षण प्रदर्शन 22 (DefExpo22) चे केले उद्घाटन
नवी दिल्ली, 19 ऑक्टोबर 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील गांधीनगर येथील महात्मा मंदिर परिषद आणि प्रदर्शन केंद्रात संरक्षण प्रदर्शन 22 (DefExpo22) चे उद्घाटन केले. पंतप्रधानांनी भारताच्या दालनात हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने डिझाइन केलेल्या स्वदेशी ट्रेनर(प्रशिक्षण देणारे ) विमान एचटीटी-40 चे अनावरण केले. पंतप्रधानांनी कार्यक्रमादरम्यान, मिशन डेफस्पेसचा शुभारंभ केला आणि गुजरातमधील डीसा हवाईक्षेत्राची पायाभरणी केली.
मेळाव्याला संबोधित करताना,पंतप्रधान आणि गुजरातचे सुपुत्र या नात्याने, पंतप्रधानांनी, सक्षम आणि आत्मनिर्भर भारताच्या या कार्यक्रमामध्ये प्रतिनिधींचे स्वागत केले.
अमृत कालात नवीन भारताच्या संकल्पांचे आणि त्याच्या क्षमतांचे चित्र यात साकारले जात आहे असा डेफएक्सपो22 चा उल्लेख पंतप्रधानांनी केला. देशाच्या विकासाचे तसेच राज्यांच्या सहकार्याचे हे एकत्रीकरण आहे. “यात तरुणांचे सामर्थ्य आणि स्वप्ने आहेत, यात तरुणांचा संकल्प आणि क्षमता आहेत. यात जगाच्या आशा आहेत आणि मैत्री असलेल्या राष्ट्रांसाठी संधी आहेत.” असे पंतप्रधान म्हणाले.
फक्त भारतीय कंपन्याचाच सहभाग आणि केवळ मेड इन इंडिया उपकरणे असलेले हे पहिलेच संरक्षण प्रदर्शन आहे असे यंदाच्या संरक्षण प्रदर्शनाचे वेगळेपण अधोरेखित करताना पंतप्रधानांनी सांगितले ”. “लोहपुरुष सरदार पटेल यांच्या भूमीतून आम्ही भारताच्या सक्षमतेचे उदाहरण जगासमोर ठेवत आहोत असे ते म्हणाले. प्रदर्शनात 1300 हून अधिक प्रदर्शक सहभागी झाले आहेत. यात भारत संरक्षण उद्योग, भारतीय संरक्षण उद्योगाशी संबंधित काही संयुक्त उपक्रम, एमएसएमई आणि 100 हून अधिक स्टार्टअपचा समावेश आहे. हे प्रदर्शन एकाच नजरेत भारताची क्षमता आणि त्यात दडलेल्या संधींची झलक देते. यानिमित्ताने पहिल्यांदाच 400 हून अधिक सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या जात आहेत अशी माहिती त्यांनी दिली.
विविध देशांकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादाची दखल घेत, भारत आपल्या स्वप्नांना आकार देत असताना आफ्रिकेतील 53 मित्र देश आपल्यासोबत वाटचाल करत आहेत याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला.
यानिमित्ताने दुसरा भारत-आफ्रिका संरक्षण संवादही होणार असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. “भारत आणि आफ्रिका यांच्यातील हे नाते काळाच्या कसोटीवर तावूनसुलाखून निघालेल्या विश्वासावर आधारित आहे. ते काळाच्या ओघात अधिक दृढ होत आहे आणि नवीन आयामांना स्पर्श करत आहे”, असे पंतप्रधान म्हणाले. आफ्रिका आणि गुजरातमधील जुन्या संबंधांचा उल्लेख करत पंतप्रधानांनी आफ्रिकेतील पहिल्या रेल्वे मार्गाच्या उभारणीत कच्छमधील लोकांचा सहभाग असल्याच्या आठवणीला उजाळा दिला. आफ्रिकेतील दैनंदिन जीवनात वापरल्या जाणार्या अनेक शब्दांचे मूळ आफ्रिकेतील गुजराती समुदायात आहे. “महात्मा गांधींसारख्या जागतिक नेत्यासाठीही, जर गुजरात त्यांची जन्मभूमी असेल, तर आफ्रिका ही त्यांची पहिली ‘कर्मभूमी’ होती. आफ्रिकेबद्दलची ही आत्मीयता अजूनही भारताच्या परराष्ट्र धोरणात केंद्रस्थानी आहे. कोरोनाच्या काळात, जेव्हा संपूर्ण जग लसीबाबत चिंताक्रांत होते, तेव्हा भारताने आफ्रिकेतील आपल्या मित्र देशांना प्राधान्य देत लस वितरित केली,” असे ते म्हणाले.
दुसरी हिंद महासागर क्षेत्र+ (आयओआर+) परिषद देखील प्रदर्शनादरम्यान आयोजित केली जाईल. पंतप्रधानांच्या दूरदृष्टीच्या अनुषंगाने प्रदेशातील सर्वांसाठी सुरक्षा आणि विकासासाठी (सागर-Security and Growth for All in the Region -SAGAR) शांतता, वाढ, स्थिरता आणि समृद्धीकरता आयओआर+ राष्ट्रांमधील संरक्षण सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी व्यापक संवादासाठी ती एक मंच प्रदान करेल. “आज आंतरराष्ट्रीय सुरक्षेपासून ते जागतिक व्यापारापर्यंत सागरी सुरक्षा ही जागतिक प्राथमिकता म्हणून उदयास आली आहे असे पंतप्रधान म्हणाले. जागतिकीकरणाच्या युगात व्यापारी नौदलाची (मर्चंट नेव्हीची) भूमिकाही विस्तारली आहे.” “भारताकडून जगाच्या अपेक्षा वाढल्या आहेत आणि मी जागतिक समुदायाला खात्री देतो की भारत त्या पूर्ण करेल. त्यामुळे हे संरक्षण प्रदर्शन भारताप्रती असलेल्या जागतिक विश्वासाचेही प्रतीक आहे असे ते म्हणाले.
विकास आणि औद्योगिक क्षमतांबाबत गुजरातची ओळख असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. “हा डिफेन्स एक्स्पो या ओळखीला एक नवी उंची देत आहे”. आगामी काळात गुजरात संरक्षण उद्योगाचे प्रमुख केंद्र म्हणून उदयास येईल, असेही ते पुढे म्हणाले.
गुजरातमधील डीसा हवाई क्षेत्राची पायाभरणीही पंतप्रधानांनी केली. आघाडीवरील हवाईदल तळ देशाच्या सुरक्षा रचनेत भर घालेल. डीसा सरहद्दीच्या जवळ आहे हे लक्षात घेता आता भारत पश्चिम सीमेवरील कोणत्याही आगळीकीला प्रत्युत्तर देण्यासाठी अधिक सज्ज आहे असे पंतप्रधान म्हणाले. “सरकारमध्ये आल्यानंतर आम्ही डीसा येथे कार्यान्वयन तळ उभारण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या सैन्यदलांची ही अपेक्षा आज पूर्ण होत आहे. हा प्रदेश आता देशाच्या सुरक्षेचे एक प्रभावी केंद्र बनेल,” असे मोदी म्हणाले.
“अवकाश तंत्रज्ञान हे भविष्यात कोणत्याही मजबूत राष्ट्रासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे असेल. तिन्ही सैन्यदलांनी अवकाश तंत्रज्ञानातील विविध आव्हानांचे पुनरावलोकन करत त्यांची नोंद घेतली. त्यांचे निराकरण करण्यासाठी आपल्याला वेगाने काम करावे लागेल असे ते म्हणाले.” “मिशन डिफेन्स स्पेस”, “नवोन्मेषाला प्रोत्साहन आणि आपल्या सैन्याला बळकट करण्यासोबतच नवीन आणि नाविन्यपूर्ण उपाय देखील प्रदान करेल.” अवकाश तंत्रज्ञान भारताच्या उदार अवकाश मुत्सद्देगिरीच्या नवीन संकल्पनांना आकार देत आहे आणि नवीन शक्यतांना जन्म देत आहे यावर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला. “अनेक आफ्रिकी देश आणि इतर अनेक लहान देशांना याचा फायदा होत आहे”,असेही ते पुढे म्हणाले. साठपेक्षा अधिक विकसनशील देशांबरोबर भारत आपले अवकाश विज्ञान सामायिक करत आहे. दक्षिण आशिया उपग्रह हे याचे प्रभावी उदाहरण आहे. पुढील वर्षापर्यंत, दहा आसियान देशांनाही भारताचा उपग्रह डेटा वास्तव वेळेत उपलब्ध होईल. अगदी युरोप आणि अमेरिकेसारखे विकसित देशही आपला उपग्रह डेटा वापरत आहेत, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली.
संरक्षण क्षेत्रात, इच्छाशक्ती, नवोन्मेष आणि अंमलबजावणी या त्रिसूत्रीच्या मंत्रासह नवभारताची आगेकूच सुरू आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. आठ वर्षांपूर्वीच्या काळापर्यंत जगातला सगळ्यात मोठा संरक्षण विषयक आयातदार देश म्हणून भारताची ओळख होती. मात्र नवभारताने , इच्छाशक्ती, दाखवली, दृढनिश्चय केला आणि आता मेक इन इंडिया हा भारताच्या संरक्षण क्षेत्रातला एक यशस्वी अध्याय होत चालला आहे. “आपली संरक्षण निर्यात गेल्या पाच वर्षात आठ पटीने वाढली आहे. आपण जगभरातल्या 75 हून जास्त देशांना आता संरक्षण सामग्री आणि उपकरणे निर्यात करत आहोत. भारताची संरक्षण निर्यात 2021-22 या वर्षात एक अब्ज 59 कोटी अमेरिकी डॉलर्सपर्यंत म्हणजेच 13 हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे आणि येणाऱ्या काळात, पाच अब्ज डॉलर्स म्हणजेच चाळीस हजार कोटी रुपयांची संरक्षण निर्यात करण्याचे उद्दिष्ट आपण ठेवले आहे,” असेही त्यांनी पुढे सांगितले.
भारताच्या लष्कराने भारतीय तंत्रज्ञानाच्या मदतीने आपली क्षमता आणि लढाईतले कौशल्य सिद्ध केले असल्यामुळे जग आता भारतीय तंत्रज्ञानावर विश्वास ठेवत आहे. आय एन एस विक्रांत सारख्या, अत्याधुनिक अशा लढाऊ विमान वाहून नेणाऱ्या अत्याधुनिक युद्धनौकेचा, भारतीय नौदलाने आपल्या ताफ्यात समावेश केला आहे.अभियांत्रिकीचा हा महाकाय आणि अतिशय विराट असा सर्वोत्कृष्ट नमुना, कोचीन शिपयार्ड लिमिटेडने, स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून घडवला आहे. मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत बनवलेल्या प्रचंड या कमी वजनाच्या लढाऊ हेलिकॉप्टरचा समावेश भारतीय हवाई दलाने आपल्या ताफ्यात केलेला समावेश, हे सुद्धा भारताच्या संरक्षण विषयक क्षमतेचे एक ठळक उदाहरण आहे, असे ते म्हणाले.
भारताचे संरक्षण क्षेत्र आत्मनिर्भर म्हणजे स्वावलंबी बनवण्याच्या प्रक्रियेवर प्रकाश टाकत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की भारतीय लष्करानेसुद्धा भारतामध्येच तयार झालेले लष्करी साहित्य खरेदी करण्याचे ठरवले असून, अशा उपकरणांच्या दोन याद्या तयार केल्या आहेत. अशा 101 वस्तूंची यादी आज आम्ही प्रसिद्ध करत आहोत. असे निर्णय सुद्धा आत्मनिर्भर भारताचे सामर्थ्य दाखवून देत असतात. या यादीनंतर पुढे,संरक्षण क्षेत्रासाठी आवश्यक असलेल्या लष्करी साहित्याची आणखी 411 उपकरणं, मेक इन इंडिया उपक्रमा अंतर्गतच तयार करण्यात येतील, निश्चित केलेल्या या 411 उपकरणांची बाहेरून आयात केली जाणार नाही.’ एवढ्या मोठ्या आर्थिक उलाढालीमुळे भारतीय संरक्षण उद्योगाचा पाया भक्कम होईल आणि त्यामुळे भारतीय संरक्षण साहित्य उत्पादक कंपन्या कर्तृत्वाची नवी शिखरे गाठतील, अशी माहिती त्यांनी दिली. यामुळे देशातल्या युवा वर्गाला जास्तीत जास्त फायदा होईल असे ते पुढे म्हणाले.
संरक्षणविषयक सामग्री पुरवठ्याच्या क्षेत्रात काही कंपन्यांनी निर्माण केलेली मक्तेदारी मोडून काढण्यासाठी आता नवनवे विश्वासार्ह पर्याय पुढे येत आहेत ही बाब पंतप्रधानांनी अधोरेखित केली. “या संरक्षण उद्योग क्षेत्रात काही करू इच्छिणाऱ्या भारताच्या युवावर्गाने या क्षेत्रातली ही मक्तेदारी मोडून काढण्याचे सामर्थ्य दाखवले आहे आणि आपल्या युवा वर्गाचे हे प्रयत्न संपूर्ण जगालाही ललामभूत ठरणार आहेत,” असे मोदी म्हणाले. संसाधनांच्या अभावी संरक्षणात मागे पडलेल्या छोट्या देशांनाही यातून मोठा लाभ मिळणार असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
“भारत संरक्षण क्षेत्राकडे अगणित संधींकडे झेपावता येईल असे असीमित आकाश म्हणून बघत असून, यातून चांगल्या संधी वास्तवात कशा उतरवता येतील याचा विचार करत आहे”, असेही पंतप्रधान म्हणाले.
भारतातल्या संरक्षण क्षेत्रात उपलब्ध असलेल्या गुंतवणुकीच्या संधींबाबत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माहिती दिली की भारत, उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये दोन संरक्षणविषयक उद्योग पट्टे म्हणजेच कॉरिडॉर उभारत असून जगभरातल्या मोठमोठ्या कंपन्या इथे गुंतवणूक करण्यासाठी पुढे सरसावत आहेत. या क्षेत्रामध्ये भारतीय सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांची उपयुक्तता स्पष्ट करुन ते पुढे म्हणाले की जगभरातल्या मोठ्या कंपन्यांना आपले सूक्ष्म लघु मध्यम उद्योग क्षेत्र, या गुंतवणुकीशी निगडीत पुरवठा साखळीचे मोठे जाळे निर्माण करून, पाठबळ पुरवेल. या क्षेत्रातल्या अशा प्रकारच्या मोठ्या प्रमाणातल्या गुंतवणुकीमुळे आपल्या देशातल्या युवा वर्गासाठी खूप मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होईल, ज्याचा याआधी कधी विचारच झाला नव्हता, असे पंतप्रधानांनी पुढे सांगितले.
या संरक्षण प्रदर्शनात उपस्थित असलेल्या सर्व कंपन्यांचा उल्लेख करत पंतप्रधानांनी त्यांना कळकळीची विनंती केली की त्यांनी भविष्यातल्या भारताला केंद्रस्थानी ठेवून या क्षेत्रातल्या सर्व संधींची निर्मिती करावी. “तुम्ही नवनव्या नवोन्मेषी कल्पना राबवा, जगात सर्वोत्तम ठरण्याची प्रतिज्ञा करा आणि समर्थ विकसित भारताचे स्वप्न साकारा. तुमच्या या सर्व प्रयत्नांमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचे सहकार्य करण्यासाठी मी नक्की पाठीशी उभा असेन,” असे सांगत त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.
याप्रसंगी अन्य मान्यवरांसह, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी, नौदल प्रमुख अॅडमिरल आर.हरी कुमार आणि संरक्षण विभागाचे सचिव डॉ.अजय कुमार हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
पार्श्वभूमी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिफेन्स एक्सपो 2022 चे उद्घाटन केले. पाथ टू प्राइड ही या कार्यक्रमाची संकल्पना असून आजवरच्या डिफेन्स एक्स्पो कार्यक्रमांच्या तुलनेत या कार्यक्रमाला सर्वात मोठा प्रतिसाद लाभला आहे. प्रथमच, या कार्यक्रमात, फक्त भारतीय कंपन्यांसाठी संरक्षण प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे, ज्यात परदेशी OEM(original equipment manufacturers, म्हणजेच उपकरणांच्या मूळ उत्पादक कंपन्या) च्या भारतीय उपकंपन्या, भारतात नोंदणीकृत कंपन्यांचा विभाग, भारतीय कंपन्यांसोबत संयुक्त उपक्रम राबवणारे प्रदर्शक यांचा समावेश आहे. हा कार्यक्रम भारतीय संरक्षण उत्पादनांच्या कौशल्याची विस्तृत व्याप्ती आणि सामर्थ्य दाखवेल. प्रदर्शनामध्ये संपूर्ण भारतासाठीचे एकत्रित असे एक दालन आणि दहा, राज्य दालने असतील. भारत दालनात, पंतप्रधानांनी HTT-40 या, हिंदुस्तान एरोनॉटिक लिमिटेड (HAL) ने विकसित केलेल्या प्रशिक्षण देणाऱ्या स्वदेशी बनावटीच्या विमानाचे अनावरण केले. या विमानात जगातल्या विद्यमान परिस्थितीत वापरल्या जाणाऱ्या अत्याधुनिक प्रणाली आहेत आणि या विमानाची रचना पूर्णपणे वैमानिक स्नेही आहे.
कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी मिशन डिफेन्स स्पेसचे देखील उद्घाटन केले. हे मिशन, उद्योग आणि स्टार्टअप्सच्या माध्यमातून अंतराळ क्षेत्रात संरक्षण दलांकरता नाविन्यपूर्ण उपक्रम विकसित करण्यासाठी आहे. गुजरातमधील डीसा (Deesa) हवाईतळाची पायाभरणीही पंतप्रधानांनी केली. या आधुनिक हवाई तळामुळे देशाच्या संरक्षण विषयक सुविधांमध्ये भर पडेल.
‘भारत-आफ्रिका: संरक्षण आणि सुरक्षाविषयक सहकार्याच्या समन्वयासाठी रणनीती स्वीकारणे’ या संकल्पने अंतर्गत या एक्स्पोमध्ये, दुसऱ्या भारत-आफ्रिका संरक्षण संवादसत्राचे आयोजन होत आहे्. हिंद महासागर क्षेत्र आणि जवळचे इतर देश (IOR+) परिषद देखील प्रदर्शनादरम्यान आयोजित केली जाईल. ही परिषद, पंतप्रधानांच्या संकल्पाच्या अनुषंगाने , शांतता, विकास, स्थैर्य आणि समृद्धीसाठी IOR+ राष्ट्रांमधील संरक्षण सहकार्याला प्रोत्साहन देण्याकरता व्यापक संवादासाठी एक मंच प्रदान करेल. या क्षेत्रातील (SAGAR ) सर्वांची सुरक्षा आणि वाढीच्या दृष्टीने , या प्रदर्शनादरम्यान, प्रथमच गुंतवणूकदारांची बैठक होणार आहे. मंथन 2022, iDEX (डिफेन्स एक्सलन्ससाठी इनोव्हेशन्स अर्थात संरक्षण क्षेत्रातल्या सर्वोत्कृष्टतेसाठी नवीन) च्या कार्यक्रमात, शंभरहून अधिक स्टार्टअप्सना त्यांच्या नवकल्पना मांडण्याची संधी मिळणार आहे. ‘बंधन’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून 451 भागीदारी उपक्रम आणि उद्घाटनही, या कार्यक्रमात होतील.

