बंगलोर- येथे सुरु असलेल्या ‘एरो इंडिया २०१९’ या प्रदर्शनात भारत फोर्ज लिमिटेड व भारत सरकारच्या नवरत्नांपैकी एक, संरक्षण क्षेत्रातील सार्वजनिक उद्यम भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल) यांच्यादरम्यान एक विशेष समझोता करार करण्यात आला आहे. संरक्षण व एरोस्पेस उत्पादने/तंत्रप्रणाली या क्षेत्रात धोरणात्मक सहकार्य करून स्वदेशी बाजारपेठेतील नवनवीन संधींचा तसेच भारत सरकारच्या मेक इन इंडियासारख्या उपक्रमांचा लाभ घेण्याच्या उद्देशाने हा महत्त्वपूर्ण करार करण्यात आला आहे.
या समझोता करारामुळे भारत फोर्ज व बीईएल यांना त्यांनी स्वतंत्रपणे किंवा संयुक्तपणे विकसित केलेली संरक्षण उत्पादने / तंत्रप्रणाली जागतिक बाजारपेठेत निर्यात करण्यासाठी उपलब्ध संधींचा लाभ घेता येईल. अशाप्रकारे या दोन्ही कंपन्या भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या निर्यात प्रोत्साहन धोरणाचाही जास्तीत जास्त लाभ घेऊ शकतील.
रडार व शस्त्रास्त्रे तंत्रप्रणाली, एनसीएस व संचार व्यवस्था, इलेक्ट्रॉनिक युद्धसामग्री व वैमानिकी, नौसेनेसाठी लागणारी तंत्रप्रणाली, इलेक्ट्रो-ऑप्टिक्स उत्पादने, टॅंक इलेक्ट्रॉनिक्स व गन सिस्टिम्स, सॅटकॉम, देशांतर्गत सुरक्षा व स्मार्ट सिटीसाठी लागणारी सोल्युशन्स, स्ट्रॅटेजिक कंपोनंट्स आणि निवडक नागरी उत्पादनांची रचना, विकास, अभियांत्रिकी व उत्पादन यामध्ये बीईएल कुशल आहे.
भारत फोर्ज ही तब्बल ३ बिलियन डॉलर्सची आर्थिक उलाढाल असलेल्या कल्याणी ग्रुपची प्रमुख कंपनी आहे. दर्जेदार, अतिशय चांगली कामगिरी बजावणाऱ्या, नाविन्यपूर्ण सुरक्षा तसेच इतर महत्त्वपूर्ण कामांशी संबंधित उत्पादने व सुविधा विविध क्षेत्रांना पुरवणारी ही जागतिक पातळीवरील आघाडीची कंपनी आहे. ऑटोमोटिव्ह, संरक्षण, एरोस्पेस, रेल्वे, ऊर्जा, बांधकाम व खाण, समुद्री वाहतूक व व्यापार, तेल व वायू अशा विविध क्षेत्रांमध्ये या कंपनीची उत्पादने व सेवा वापरल्या जातात. संरक्षण क्षेत्राच्या बाबतीत तोफा, बंदुका, युद्धात वापरल्या जाणाऱ्या गाड्या, संरक्षित वाहने, दारुगोळा, संरक्षण इलेक्ट्रॉनिक्स व छोटी हत्यारे यांची रचना, विकास, अभियांत्रिकी व उत्पादन यामध्ये ही कंपनी आघाडीवर आहे.
भारत फोर्जचे अध्यक्ष व सीईओ (डिफेन्स अँड एरोस्पेस) श्री. राजिंदर सिंग भाटिया व बीईएलच्या मार्केटिंग विभागाच्या डायरेक्टर श्रीमती आनंदी रामलिंगम यांनी भारत फोर्जचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर श्री. बाबा कल्याणी व बीईएलचे सीएमडी श्री. गौतमा एम व्ही यांच्या उपस्थितीत या समझोता करारावर स्वाक्षऱ्या केल्या.