मुंबई, सप्टेंबर 15, 2017. मध्य प्रदेश टुडे मीडिया लि. या 13 आवृत्त्या असलेल्या व मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, दिल्ली व उत्तर प्रदेश येथे अंदाजे 20 वितरण असलेल्या आघाडीच्या दैनंदिन वृत्तपत्राने 19 सप्टेंबर 2017 रोजी प्रारंभी समभाग विक्री (आयपीओ) सुरू करण्याचे ठरवले आहे. कंपनीच्या आयपीओमध्ये प्रत्येकी 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या, प्रति इक्विटी शेअर 66 रुपये किंमत असलेल्या एकूण 1416.69 लाख रुपयांच्या 21,46,500 इक्विटी शेअर्सचा समावेश असेल. विक्रीनंतरच्या कंपनीच्या इक्विटी भागभांडवलामध्ये या विक्रीचे योगदान 47.01% असेल. शेअर्सची नोंदणी एनएसई इमर्ज येथे केली जाणार आहे आणि आयपीओ 21 सप्टेंबर 2017 रोजी बंद होणार आहे. विक्रीसाठी मार्क कॉर्पोरेट अॅडव्हॉयजर्स प्रायव्हेट लिमिटेड ही एकमेव लीड मॅनेजर आहे.
विक्रीतून मिळणाऱ्या रकमेचा वापर मध्य प्रदेश व छत्तीसगडमधील विविध शहरांतील युनिट ऑफिसेसमध्ये सुधारणा करून व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी, खेळत्या भांडवलाची गरज पूर्ण करण्यासाठी, कंपनीच्या सर्वसाधारण खर्चांसाठी व इश्यूच्या खर्चासाठी केला जाणार आहे.
मध्य प्रदेश टुडे मीडिया लि.तर्फे ‘प्रदेश टुडे’ या नावाने भोपाळ, इंदूर, ग्वाल्हेर, जबलपूर, रेवा, काटनी, सागर, उज्जैन, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, छिंदवाडा व रायपूर येथून दैनिक वृत्तपत्राच्या 13 आवृत्त्या, तसेच भोपाळ व जबलपूर येथून दोन संध्याकाळच्या आवृत्त्या प्रकाशित केल्या जातात. कंपनीचे www.pradeshtoday.com हे ऑनलाइन पोर्टलही आहे. प्रदेश टुडे 2010 मध्ये मध्य प्रदेशात प्रथम सुरू झाले.
मध्य प्रदेश टुडे मीडिया लि.ने 2017, 2016 व 2015 या आर्थिक वर्षांमध्ये अनुक्रमे 192,755,007 रुपये, 152,425,146 रुपये व 154,115,764 रुपये उलाढाल केली आहे आणि अनुक्रमे 23,302,760 रुपये, 6,521,908 रुपये व 4,199,171 रुपये नफा कमावला आहे. गेल्या वर्षी, 90% उत्पन्न जाहिरातीतून मिळाले, तर उरलेले वृत्तपत्राच्या प्रतींच्या विक्रीतून मिळाले.
भारतातील प्रिंट उद्योग 2014 मधील 263 अब्ज रुपयांवरून 2015 मध्ये 283 अब्ज रुपयांपर्यंत, म्हणजे 7.60 टक्क्यांनी वाढले. 2015 मध्ये झालेल्या 7.30 टक्के वाढीमध्ये प्रिंट जाहिरातीतून मिळालेले उत्पन्न 189 अब्ज रुपयांपर्यंत वाढले. 2010 ते 2015 या दरम्यान जाहिरातींचे उत्पन्न दरवर्षी 8.50 टक्के वाढले आहे, तर याच कालावधीत वितरणात वार्षिक 7.1 टक्के वाढ झाली. जाहिरात हा प्रिंट उद्योगाचा कणा असून त्याचे एकूण उत्पन्नामध्ये योगदान 66 टक्क्यांहून अधिक आहे, तर उर्वरित उत्पन्न वितरणातून मिळते.
वाचकवर्ग देशातील महानगरे व टिअर-I शहरांपुरता मर्यादित असून, कंपन्यांचे जाहिरातींसाठीचे बजेट इंग्रजी भाषेतील वृत्तपत्रांवर प्रामुख्याने खर्च केले जाण्याचे प्रमाण हळूहळू कमी होत आहे. जाहिरातदार आता हिंदी व मातृभाषेतील प्रिंट मीडियाला अधिक प्राधान्य देऊ लागले आहेत, कारण ही माध्यम्ये देशातील झपाट्याने विकसित होणाऱ्या टिअर-II व टिअर-III शहरांतील ग्राहकांपर्यंत थेट पोहोचतात.