पुणे : भारत माझा देश आहे… सारे भारतीय माझे बांधव आहेत… हे प्रतिज्ञेमधील वाक्य प्रत्यक्षात उतरवून विद्यार्थ्यांसमोर आदर्श निर्माण करण्याकरीता न-हे येथील जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटस् तर्फे शहराच्या पूर्व भागातील मुस्लिम कुटुंबांसमवेत ईद आणि दिवाळी साजरी करण्यात आली. नुकत्याच पार पडलेल्या ईद-ए-मिलाद आणि येत्या दिपावलीच्या निमित्ताने ५० मुस्लिम कुटुंबांना महिनाभर पुरेल इतके धान्य किट भेट देण्यात आले.
गुरुवार पेठेतील हामीद सय्यद ट्रस्टी हजरत रझा शहा शिया ट्रस्ट, फरमान भाई ट्रस्टी हजरत रझा शहा ट्रस्ट येथे झालेल्या कार्यक्रमात हे किट देण्यात आले. यावेळी जाधवर ग्रुपचे उपाध्यक्ष अॅड.शार्दुल जाधवर, सामाजिक कार्यकर्ते सय्यद सईद, खिसाल जाफरी, तसदुक सय्यद, मतिन सय्यद आदी उपस्थित होते.
सय्यद सईद म्हणाले, प्रत्येक धर्म हा माणसाला माणुसकी शिकवितो. महमंद पैगबरांनी देखील हीच शिकवण दिली आहे. सामाजिक, राजकीय क्षेत्रांतील सर्वांना सोबत घेऊन गरजूंकरीता कार्य करणे आवश्यक आहे. इस्लाम धर्मामध्ये शांततेचा संदेश देण्यात आला आहे.
अॅड.शार्दुल जाधवर म्हणाले, ईद आणि दिवाळीच्या निमित्ताने हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश सर्वत्र पोहोचावा, याकरीता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अन्नदान करुन ईदचा आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. तर, दिवाळीच्या निमित्ताने प्रत्येक घरात चांगले भोजन मिळावे, याकरीता धान्य किट देण्यात येत आहेत. अनेकांनी स्वातंत्र्यासाठी रक्त सांडले, ते एकाच धर्माचे नव्हते. तरीही त्यांनी एकत्रितपणे लढा दिला. आपापसातील भाईचारा तोडला नाही. धर्मनिरपेक्ष भारताची उभारणी करण्याकरीता आपण प्रथम भारतीय आहोत, हा विचार रुजवायला हवा, असेही त्यांनी सांगितले.

