नवी दिल्ली, 22 डिसेंबर 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थ विषयक समितीने 2022 च्या हंगामाकरिता खोबऱ्यासाठीच्या किमान आधारभूत किमतीला (एमएसपी) मंजुरी दिली.
तेल काढण्याच्या घाणीसाठी उपयुक्त योग्य सरासरी गुणवत्ता (एफएक्यू) असलेल्या खोबऱ्याच्या एमएसपी मध्ये 2021 च्या प्रती क्विंटल 10,335 रुपयांवरून वाढ करून 2022 च्या हंगामासाठी 10,590 रुपये प्रती क्विंटल करण्यात आली आहे. गोटा खोबऱ्यासाठीच्या एमएसपी मध्ये 2021 च्या प्रती क्विंटल 10,600 रुपयांवरून वाढ करून 2022 च्या हंगामासाठी 11,000 रुपये प्रती क्विंटल करण्यात आली. हे अखिल भारतीय सरासरी उत्पादन खर्चापेक्षा खोबरे घाणीसाठी 51.85 टक्के आणि गोटा खोबऱ्यासाठी 57.73 टक्के लाभ सुनिश्चित करते. 2022 हंगामासाठी खोबऱ्याच्या एमएसपीमधली वाढ ही अखिल भारतीय सरासरी खर्चाच्या किमान दीड पट स्तरावर निश्चित करण्याच्या तत्वाला अनुसरून आहे. 2018-19 च्या अर्थसंकल्पात याची घोषणा सरकारने केली होती.
कृषी खर्च आणि मूल्य आयोगाच्या शिफारसीवर हा निर्णय आधारित आहे.
2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टीने लाभ रूपाने किमान 50 टक्के नफा सुनिश्चित करणे हे महत्त्वपूर्ण आणि प्रगतिशील पाऊल आहे.
भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघ लिमिटेड आणि भारतीय राष्ट्रीय सहकारी ग्राहक संघ हे नारळ उत्पादक राज्यांतील एमएसपी आधारभूत कार्यासाठी केंद्रीय नोडल एजन्सी म्हणून काम जारी ठेवतील.