बीडीपी आरक्षित जागेत प्लॉटिंग करून विक्री करण्याचा डाव महापालिकेच्या बांधकाम विभागाने उधळून लावला
पुणे- आगामी महापालिका निवडणुकीला उभे राहण्यासाठी अनेक बिल्डर आणि भूमाफिया सरसावले असताना आता कात्रज आणि दक्षिण पुण्याच्या परिसरातील डोंगर-टेकड्यांवर बीडीपी आरक्षण असताना अनधिकृतपणे प्लॉटिंग करून खासगी भूमाफियाकडून खोट्या प्रलोभन व माहितीद्वारे सामान्य नागरिकांची फसवणूक केली जात आहे.बीडीपी आरक्षित जागेत प्लॉटिंग करून विक्री करण्याचा डाव महापालिकेच्या बांधकाम विभाग झोन 2ने उधळून लावला आहे.
कात्रज नवीन हद्द सर्वे क्रमांक 38 व 40 येथील डोंगर-उतारावरील बिडीपी झोन क्षेत्रामधील सुमारे 6 एकर अनधिकृत प्लॉटिंगवरील लोंखंडी पत्राशेड, कॉंक्रिट रस्ते, रिटेनिंग वॉल, पाण्याच्या टाकी, सिमेंट पोल तसेच पक्के बांधकाम यावर पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली. बांधकाम विकास विभागाचे अधिक्षक अभियंता युवराज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली, कार्यकारी अभियंता राहुल साळुंखे यांच्या नियंत्रणाखाली उपअभियंता प्रताप धायगुडे, शाखा अभियंता प्रशांत मोरे, कनिष्ठ अभियंता हेमंत कोळेकर, अभिजित भुजबळ, बाळासाहेब बदडे, करण शिर्के, निखिल रोडे यांनी ही कारवाई केली.
घराचे स्वप्न दाखवत बीडीपी आरक्षित जागा विकून सामान्य जनतेची फसवणूक केली जात आहे. ही बाब गंभीर असून नागरिकांनी स्वतःची फसवणूक होऊ देऊ नये यासाठी काळजी घ्यावी. महापालिका नियमितपणे बीडीपी क्षेत्रावर कारवाई करणार आहे. तसेच अशा प्रकारे अनधिकृत प्लॉटिंग करणाऱ्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करू. – प्रताप धायगुडे, उपअभियंता, बांधकाम विभाग.

