धनकवडीतल्या बॅंकेचेही संगनमत
पुणे – विकसनासाठी दिलेल्या मिळकतमध्ये तीन मजले बांधण्याची परवानगी असतानाही बनावट दस्त ऐवज तयार करून चौथा मजल्याचे बांधकाम करून तीन फ्लॅटची विक्री केल्याप्रकरणात दोघांना न्यायालयाने जामीन मंजुर केला.
रामेश्वर सर्वदमन सांबारी (वय 44) आणि संतोष रमन्ना शेट्टी (वय 46, दोघेही, रा. कोथरूड) अशी जामीन मिळालेल्या दोघांची नावे आहेत. दोघांनी ऍड. सुचित मुंदडा यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. दोघांनी कोणाचीही फसवणूक केली नसल्याचा युक्तीवाद ऍड. मुंदडा यांनी न्यायालयात केला. ही घटना मार्च 2016 ते आतापर्यंतच्या कालावधीत धानोरी येथे घडली.
सेवानिवृत्त सेक्रेटरी डिफेन्स फायनान्स डॉ. विजयालक्ष्मी गुप्ता यांनी याबाबत विश्रांतवाडी पोलिसात फिर्याद दिली आहे. चौथ्या मजल्यावर बांधलेल्या तीन फ्लॅटसाठी धनकवडी येथील एका बॅंकेकडे गृहकर्जासाठी खोटी आणि बनावट कागदपत्रे सादर केली.
बॅंकेच्या अधिकाऱ्यांनीही त्याची पडताळणी न करता, दोघा आरोपींसोबत संगणमत करून कर्ज मंजुर केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी पोलिसांनी सांबारी, शेट्टी या दोघांना अटक केली आहे. सुरूवातीला पोलीस कोठडी, त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर ऍड. सुचित मुंदडा यांनी केलेल्या अर्जानुसार न्यायालयाने जामीन मंजुर केला.

