Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

कर्नाटकच्या अत्याचारी प्रवृत्तीचा एकमताने निषेध , ८६५ गावे आमची, इंच इंच जागा घेऊ -विधिमंडळात ठराव संमत

Date:

नागपूर- कर्नाटक सरकारच्या मराठी विरोधी प्रवृत्तीचा निषेध करणारा ठराव विधिमंडळात मांडण्यात आला. तो एकमतानं मंजूर करण्यात आला. याचबरोबर बेळगाव, कारवार, निपानी, बिदर या शहरांसह सर्वोच्य न्यायालयातील दाव्यातील सर्व गावं कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात समाविष्ट करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात पाठपुरावा करण्यात येईल. सनदशीर मार्गानं लढा देण्यात येईल. ८६५ गावातील मराठी भाषिक जनतेसोबत महाराष्ट्र सर्व ताकदीनिशी उभे राहील, अशा आशयाचा ठराव एकमतानं मंजूर झाला.सभागृहातील दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी बाके वाजवत एकमताने ठराव संमत केला. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सीमा लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन केले तसेच सर्व सदस्यांचे त्यांनी आभारही मानले. त्याचबरोबर सीमा भागातील मराठी बांधवांसाठी महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या निर्णयांची आणि सुरू केलेल्या योजनांविषयी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी माहिती सभागृहाला दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडलेला ठराव असा :

ज्याअर्थी, नोव्हेंबर, १९५६ मध्ये राज्यांची पुर्नरचना झाल्यानंतर तत्कालीन मुंबई राज्यातील बेळगाव (चंदगड तालुका वगळून) विजापूर, धारवाड व कारवार हे मराठी भाषिक जिल्हे पूर्वीच्या म्हैसूर राज्यात विलीन करण्यात आले. महाराष्ट्राने खेडे हे एक घटक, भौगोलिक सलगता, मराठी किंवा कन्नड भाषिक लोकांची सापेक्ष बहुसंख्या व लोकेच्छा या सूत्रानुसार फेररचनेची मागणी करून कर्नाटकातील बेळगाव, निपाणी, कारवार, बिदर, भालकी या शहरांसह ८६५ सीमावादीत गावांवर दावा सांगितला आहे.

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र राज्य शासनाने दावा केलेली ८६५ गावे महाराष्ट्रात समाविष्ट व्हावी म्हणुन महाराष्ट्र शासनाने केंद्र शासन व कर्नाटक राज्य शासन यांच्याविरुद्ध मा.सर्वोच्च न्यायालयात असलेला मूळ दावा क्र.४/२००४ (Original Suit) च्या अनुषंगाने दाखल केला आहे. मा.सर्वोच्च न्यायालयात अंतरिम अर्ज क्र. I.A. 11/2014 वर सुनावणी अंती दि.१२ सप्टेंबर २०१४ रोजी, दाव्यातील साक्षी, पुरावे नोंदविण्यासाठी मा.कोर्ट कमिशनर म्हणून मा.श्री.मनमोहन सरिन, भूतपूर्व मुख्य न्यायाधीश जम्मू-काश्मीर यांची नियुक्ती केली. परंतु सदर दि.१२ सप्टेंबर २०१४ रोजी पारित केलेल्या मा.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात सुधारणा करावी या मागणीसह कर्नाटक शासनाने दि.०६ डिसेंबर २०१४ रोजी अंतरिम अर्ज क्र. I.A. 12/2014 मा.सर्वोच्च न्यायालयात दाखल केला आहे. सदर सीमावादाचा प्रश्न न्यायप्रविष्ट असून ही कायदेशीर लढाई महाराष्ट्र शासन सर्व ताकदीने लढत आहे. महाराष्ट्राच्या बाजूने खटला चालविण्यासाठी या क्षेत्रातील अनुभवी असणाऱ्या ज्येष्ठ, अनुभवी व नामांकित विधिज्ञांची पॅनेलवर नियुक्ती केली आहे.

आणि ज्याअर्थी, सीमा भागातील प्रश्न, सीमा भागातील लाखो मराठी भाषिकांवर तेथील प्रशासनाकडून वर्षोनुवर्ष होणारे अन्याय, मराठी भाषिकांना मिळत असलेली दुय्यम वागणूक, त्यांचेवर अत्याचार केले जाणे, त्यांच्या जीविताचा प्रश्न गंभीर होणे, इतकेच नव्हे तर मा. समन्वयक मंत्री, सीमाप्रश्न यांनाच कर्नाटकमध्ये प्रवेश करण्यास कर्नाटक प्रशासनाकडून बंदी घालणे, मराठी भाषिकांनी आतापर्यंत शांततेने काढलेल्या अनेक पदयात्रांवर कर्नाटक पोलिसांनी अमानुषपणे लाठीमार करणे, त्यांची आंदोलने चिरडण्याचा प्रयत्न करणे व महाराष्ट्र राज्यातील वाहनांवर हल्ले करणे, तेथील मराठी भाषिकांच्या जमिनी स्थानिक विकास प्राधिकरणांकरिता संपादित करुन त्याचे भुखंड कन्नड भाषिकांना वितरित करणे तसेच अल्पसंख्य आयोगाने व मा. उच्च न्यायालयांनी दिलेल्या मराठीसह दोन्ही भाषांमध्ये स्थानिक प्राधिकरणातील दिली जाणारी शासकीय सर्व कागदपत्रे, आदेशाची अंमलबजावणी न करता स्थानिक मराठी भाषिकांची संख्या कमी करण्यासाठी प्रयत्न करणे इ. बाबी कर्नाटकातील स्थानिक प्रशासनाकडून जाणीवपूर्वक केला जात आहे.

या सर्व बाबींवर केंद्र शासनाने हस्तक्षेप करण्यासाठी दि. १४ डिसेंबर २०२२ रोजी केंद्रीय गृहमंत्री यांनी नवी दिल्ली येथे कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि मी तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत दोन्ही राज्यांमध्ये समन्वय ठेऊन सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत वाद न वाढविता दोन्ही राज्यांमध्ये शांतता ठेवण्याकरिता एकमत केले असतांना देखील विपरित भूमिका कर्नाटक शासनाने घेतलेली आहे. दरम्यान, कर्नाटक विधिमंडळाने एकही इंच जमीन न देण्याच्या दि. २२ डिसेंबर २०२२ रोजी केलेल्या ठरावामुळे सीमावादाला चिथावणी देण्याचे काम कर्नाटक सरकारकडून जाणीवपूर्वक केले जात असून कर्नाटक शासनाची ही भूमिका लोकशाही संकेतास धरुन नाही. एकाच देशातील दोन राज्यांमध्ये सौहार्दाचे वातावरण राहावे यासाठी महाराष्ट्राने अत्यंत खंबीरपणे व सर्व शक्तीनिशी या बाबतचा कायदेशीर लढा सनदशीर मार्गाने सुरू ठेवला आहे. आपण कायदेशीर बाजू मांडण्यासाठी नियमीत विधीज्ञांच्या टीम, व्यतिरिक्त ज्येष्ठ विधिज्ञ हरिष साळवे यांनी विनंती केली आहे.

आणि ज्याअर्थी, सद्यस्थितीत कर्नाटक राज्यात असलेल्या सीमा भागातील ८६५ मराठी भाषिक खेडे घटक, भौगोलिक सलगता, मराठी भाषिक लोकांची सापेक्ष बहुसंख्यता व महाराष्ट्रात समाविष्ट होण्यासाठीची तेथील लोकेच्छा या तत्वांचा महाराष्ट्र राज्याने नेहमीच आदर केला आहे, त्याअनुषंगाने त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक उन्नतीसाठी विविध सोईसुविधा व सवलती उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्यात मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या लाभांबरोबरच अभियांत्रिकी / वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी विशेष सवलत, भारतीय प्रशासकीय सेवा पूर्वप्रशिक्षणासाठी सवलत, सारथी आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळांच्या योजनांचे फायदे व इतर शासकीय संस्थांच्यामार्फत विहीत अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्याचा निर्णय आपण घेतला आहे.

त्याअर्थी आता महाराष्ट्र विधानसभा याद्वारे कर्नाटक राज्य सरकारच्या मराठी विरोधी प्रवृत्तीचा तीव्र शब्दांत निषेध करते आहे, धिक्कार करते आहे. महाराष्ट्र विधानसभा नियम ११० नुसार..

१.      कर्नाटकातील बेळगाव, कारवार, निपाणी, भालकी, बिदर या शहरांसह सर्वोच्च न्यायालयातील दाव्यातील सर्व गावे तथा शहरे यांसह मराठी भाषिक ८६५ गावांची इंच न इंच जागा तिथल्या मराठी भाषिक नागरिकांसह कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात समाविष्ट करण्यासाठी आवश्यक तो सर्व कायदेशीर पाठपुरावा, प्रयत्न सर्वोच्च न्यायालयात करण्यात येईल.

२.      मा.सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेला सीमावाद सोडविण्यासाठी हा सनदशीर मार्गाने अत्यंत खंबीरपणे दृढ निश्चयाने व संपूर्ण ताकदीनिशी लढा देण्यात येईल.

३.      कर्नाटकातील बेळगाव, कारवार, निपाणी, भालकी, बिदर या शहरांसह  ८६५ गावांतील मराठी भाषिक जनतेसोबत महाराष्ट्र शासन खंबीरपणे, निर्धाराने व सर्व ताकदीनिशी उभे आहे. केंद्र शासनाने सकारात्मक भूमिका घेऊन महाराष्ट्र राज्याच्या न्याय्य मागण्यांसाठी मराठी भाषिक खेडे, घटक, भौगोलिक सलगता, मराठी भाषक लोकांची सापेक्ष बहुसंख्यता व महाराष्ट्रात समाविष्ट होण्यासाठीची तेथील लोकेच्छा या तत्वानुसार महाराष्ट्राला साथ देण्यासाठी केंद्र शासनाला देखील महाराष्ट्र शासन विनंती करते, असा ठराव ही विधानसभा निर्धारपूर्वक एकमताने पारित करीत आहे.

४.      तसेच याबाबत केंद्र शासनाने गृह मंत्री भारत सरकार यांच्या बैठकीत झालेल्या निर्णयाची अमंलबजावणी करण्याचा आग्रह कर्नाटक शासनाकडे धरावा, तसेच सीमा भागातील मराठी जनतेच्या सुरक्षिततेची हमी घेण्याबाबत सरकारला समज देण्यात यावी.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्याला पुस्तकाची जागतिक राजधानी करणार-उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

पुणे महोत्सव खऱ्या अर्थाने भारतीय विचार, संवाद आणि संस्कृतीचा...

एक कोटी शेळ्या सोडण्याचा निर्णय हास्यास्पद:अजित पवारांनी फेटाळला वनमंत्र्यांचा प्रस्ताव

नागपूर-राज्यात बिबट्यांचा हैदोस दिवसेंदिवस तीव्र होत चालला असून मानवी...

मुंबईत 36 दिवसांत 80 हून अधिक मुलं-मुली बेपत्ता:सरकार आकडे लपवत आहे- सचिन अहिर यांचा आरोप

नागपूर -मुंबईमधून गेल्या 36 दिवसांमध्ये 80 हून अधिक मुलं-मुली...

एकनाथ शिंदे दोन महिन्यांत पुन्हा मुख्यमंत्री होणार:प्रकाश आंबेडकर यांनी वर्तवली शक्यता

मुंबई-राज्यातील महायुतीमध्ये झालेल्या अंतर्गत कलहाच्या आणि नाराजीच्या नाट्यानंतर वंचित...