पुणे-कोणत्याही खेळातील पंच, रेफरी, अंपायर हे त्या खेळाचा आत्मा असतात, महत्वाचा घटक असतात असे गौरोवोदगार महाराष्ट्र रोलबॉल संघटनेचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी काढले.महाराष्ट्र रोलबॉल संघटनेच्या वतीने आज अल्टीमेट खो खो लीग मधील पंचांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी रोलबॉल चे जनक राजू दाभाडे, खो खो फेडरेशन ऑफ इंडिया चे सचिव एम. एस. त्यागी, महाराष्ट्र खो खो संघटनेचे सचिव गोविंद शर्मा, डॉ. चरणजीत जाधव, उपकारसिंग विर्क, संजय यादव, असगर अली,भूपिंदर सिंग तिर्थी, सचिन गोडबोले, रोलबॉल संघटनेचे अखिल भारतीय सचिव चेतन भांडवलकर इ मान्यवर उपस्थित होते.
यावेळी संदीप खर्डेकर यांच्या हस्ते खो खो लीग च्या देशभरातून आलेल्या पदाधिकारी आणि पंचांचा श्री गणेशाचे चित्र फ्रेम, शाल देऊन सत्कार करण्यात आला.
ह्या लीग स्पर्धामुळे आपल्या मातीचा गंध असलेला खो खो ही कबड्डी प्रमाणे जागतिक पातळीवर मान्यता मिळवत आहे लोकप्रिय होत आहे असेही श्री. खर्डेकर म्हणाले.पंच हे कायम दुर्लक्षित राहतात किंबहुना बहुतांश वेळा ते टीकेचे धनी होतात म्हणून पुणेकरांच्या वतीने त्यांना सन्मानित करण्याचे नियोजन केले असेही श्री. खर्डेकर म्हणाले.
आपल्या पुण्यात बालेवाडी स्टेडियम मध्ये एवढी मोठी खो खो लीग होते आहे अश्या वेळी त्यातील सहभागी पंचांचा सन्मान करणे आपले कर्तव्य असून त्यामुळेच खेळ भावना वाढीस लागते आणि खेळांचे विश्व एकजुटीने आव्हानांना सामोरे जाते असे रोलबॉल खेळाचे जनक आणि क्रीडा प्रशिक्षक राजू दाभाडे म्हणाले.
ह्या हृद्य सत्कारामुळे आमचा हुरूप वाढला असून खो खो ला अधिक उंचीवर नेण्याचा आम्ही प्रयत्न करू असे खो खो फेडरेशन चे सचिव एम सी त्यागी म्हणाले.ह्या सत्काराने आम्ही पुण्यनगरीशी एका अतूट नात्याने बांधले गेलो असल्याची भावना सर्वांनी व्यक्त केली.
चेतन भांडवलकर यांनी सूत्रसंचालन केले.