‘सूर्यदत्ता नॅशनल स्कूल’ला अन्य अनेक शाळांसमवेत नुकतेच सहाव्या ‘एन्व्हॉर्यनमेंट थिएटर फेस्टिव्हल’मध्ये (इटीएफ) सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. औंधमधील पंडित भीमसेन जोशी सभागृहात झालेला हा महोत्सव ‘कमिन्स इंडिया फाऊंडेशन’ने ‘सहोदय’च्या सहकार्याने प्रायोजित केला होता. ‘इटीएफ’ हा आंतर-शालेय जागृती महोत्सव असून पुण्याचा अशा स्वरुपाचा एकमेव हरित महोत्सव आहे, जो शालेय विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाप्रती बांधीलकीचे संवर्धन करण्यासाठी समर्पित आहे. हा महोत्सव केवळ पर्यावरण समस्यांबाबत जागृती वाढवत नसून तो विद्यार्थ्यांना कलेच्या माध्यमातून आपल्या कल्पना व विचार मांडण्याचीही संधी देतो.
यंदाच्या इटीएफ महोत्सवाची संकल्पना ‘पाण्याचा प्रवास व पाण्याचे महत्त्व’ (जर्नी ऑफ वॉटर अँड इम्पॉर्टन्स ऑफ वॉटर) ही होती. विषयाची निवड करण्याची मुभा शाळांना होती. पाणी व त्याचे महत्त्व याबाबत कोणतीही उपकल्पना घेऊन विषय निवडायचा होता. ‘सूर्यदत्ता’च्या विद्यार्थ्यांनी इयत्ता पाचवी ते आठवीसाठी असलेल्या माध्यमिक शालेय श्रेणीत भाग घेतला. या शाळेच्या सात विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकासह कार्यक्रमासाठी सादरीकरण केले. त्यासाठी मूकाभिनय (माइम) ही शैली निवडण्यात आली, कारण गोंगाटाने भरलेल्या जगात शब्दांपेक्षा आपण शांतता व हावभावांच्या मदतीने अधिक चांगला संपर्क ठेऊ शकतो. शांतता हा मूकाभिनयाचा पाया असल्याने या कलाकारांनी प्राचीन सत्ये प्रतिकात्मक भाषेत लोकांपर्यंत पोचवण्यासाठी नवे मार्ग शोधून काढले. यासंदर्भात ‘सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स’चे अध्यक्ष डॉ. प्रा. संजय चोरडिया म्हणाले, “महोत्सवाची संकल्पना, कामगिरी आणि संहितेशी सुसंगती राखत या नाट्याचे नाव सार्थपणे ‘जीवनधारा’ ठेवण्यात आले होते. पाण्याचे आपल्या जीवनातील महत्त्व, तसेच पाणी जतनाचे व पाणी व्यवस्थापनाचे महत्त्व त्यातून ठळकपणे मांडले गेले.” या स्पर्धेची प्राथमिक फेरी गेल्या ११ जानेवारीला झाली. त्यात माध्यमिक शाळा श्रेणीमध्ये एकूण १७ शाळा सहभागी झाल्या होत्या. ‘सूर्यदत्ता नॅशनल स्कूल’च्या विद्यार्थ्यांच्या बुद्धिमान कलाविष्कारामुळे तो संघ अंतिम फेरीत पोचला. १९ जानेवारीला झालेल्या अंतिम फेरीतही या विद्यार्थ्यांनी प्रशंसनीय आविष्कार दाखवत ‘ओव्हरऑल परफॉर्मन्स’ श्रेणीत, तसेच ‘बेस्ट स्क्रिप्ट’ श्रेणीत ‘फर्स्ट रनर अप’ पारितोषिक पटकावले. विद्यार्थ्यांची ही कामगिरी संपूर्ण शाळेची मान अभिमानाने उंचावणारी ठरली आहे.