पुणे:
सचोटीने व्यवसाय करणार्या यशस्वी उद्योजकांना देण्यात येणारा ‘उद्यमगौरव’ पुरस्कार’ गिरींद्र कसमळकर (एम.डी. व सीईओ सॉफ्टवेअर क्वालिटी सिस्टिम्, एस.क्यु.एस पुणे) आणि गिरीश शहा व मिलिंद शहा (रमेश डाईंग, पुणे) यांना जाहीर झाला आहे.
समाजसेवा क्षेत्रात कार्यरत सुंदरगिरी महाराज (सेवागिरी देवस्थान ट्रस्ट, पुसेगाव, जि. सातारा) आणि बस्तु रेगे (संतुलन, पाषाण शाळा, पुणे) यांना ‘सेवागौरव’ पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘शेठ चिमणलाल गोविंददास मेमोरिअल ट्रस्ट’चे विश्वस्त मोहनराव गुजराथी यांनी पुणे श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत पुरस्कार्थींची माहिती दिली.
‘शेठ चिमणलाल गोविंददास मेमोरिअल ट्रस्ट’च्या वतीने हे पुरस्कार दिले जातात. 15 हजार रोख, प्रशस्तीपत्रक आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असून यंदाचे हे 19 वे वर्ष आहे.
पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. रविवार, दिनांक 3 जुलै रोजी सकाळी 10 वाजता बालशिक्षण मंदिर सभागृह (मयूर कॉलनी, कोथरूड) येथे हा समारंभ होणार आहे. यावेळी एम.आय.टी. चे संस्थापक व संत साहित्याचे अभ्यासक डॉ. विश्वनाथ कराड ‘सार्वकालिक आदर्शांच्या प्रकाशात आजच्या व्यवहाराची वाटचाल’ या विषयी आपले विचार मांडणार आहेत.
पर्यावरण शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ. माधवराव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती नियुक्त करण्यात आली होती. या समितीत ‘दि पुणे मर्चंटस चेंबर’चे अध्यक्ष प्रवीण चोरबेले, ‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीज’चे महासंचालक डॉ. अनंत सरदेशमुख, गिरीश बापट (ज्ञानप्रबोधिनी, संचालक), श्याम भुर्के (डी.जी.एम. बँक ऑफ महाराष्ट्र, प्रसिद्ध लेखक, सामाजिक कार्यकर्ते) यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.


