नागपूर – केंद्र सरकारने बनवलेला कायदा देशभर सर्व राज्यांना लागू करणे बंधनकारक असेल तर मग गोव्यात गोहत्या बंदी कायदा का लागू झाला नाही? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजप आणि केंद्र सरकारला केला आहे. हिवाळी अधिवेशनाच्या सलग चौथ्या दिवशी विरोधकांचा गदारोळ सुरूच आहे. याच दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांच्या अभिभाषणाला उत्तर देताना भाजपवर टोलेबाजी केली. गरीबांना तीन चाकी रिक्शाच परवडते असे ठाकरे म्हणाले. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारला विरोधी पक्ष नेते फडणवीस यांनी तीन चाकी ऑटो रिक्शा सरकार असे म्हटले होते. दरम्यान, आम्ही दिलेला शब्द नेहमी पाळला आणि यापुढे देखील शब्द राखणार आहोत असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
सावरकर आणि गोहत्या बंदीवरून घेतला भाजपचा समाचार
- देशात आणि राज्यात सावरकरांच्या मुद्द्यावर भाजपने रोष व्यक्त केला. राहुल गांधींनी विनायक दामोदर सावरकरांवर केलेल्या विधानानंतर त्यांनी माफी मागावी या मागणीसह महाराष्ट्र विधानसभेत गोंधळ घालण्यात आला. माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह इतर भाजप नेत्यांनी ‘मी पण सावरकर’च्या टोप्या घातल्या. परंतु, त्यांच्या मुद्द्यावर भाजपने घेतलेल्या भूमिकेबद्दल धन्यवाद. पण, त्यावर बोलण्यापूर्वी आधी भाजपने सावरकर समजून घ्यायला हवे.
- नागरिकत्व दुरुस्ती कायदा सर्वच राज्यांना बंधनकारक आहे असे म्हटले जात आहे. केंद्राने लागू केलेला कायदा देशभरातील सर्व राज्यांना बंधनकारक असेल तर मग गोहत्या बंदी कायदा देशभर लागू का केला नाही. भाजपची सत्ता असतानाही या कायद्याची देशभर अंमलबजावणी झाली नाही. गोव्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर म्हणाले होते, की राज्याला गोमांस कमी पडू देणार नाही. गरज पडल्यास दुसऱ्या राज्यातून आणले जाईल. किरण रिजीजू यांनीही ईशान्य भारतात अशीच भूमिका घेतली होती. ते कोणत्या पक्षाचे नेते होते हे भाजपने सांगावे असे आव्हान मुख्यमंत्र्यांनी दिले.
- आधी आपल्या देशातील हिंदूंचे पाहा, बाहेरच्यांना आणून ठेवणार कुठे?
देशात शेजारील मुस्लिम देशांचे बिगर मुस्लिम नागरिक आणून वसवण्यासाठी केंद्र सरकारने कायदा केला आहे. पण, त्यांना ठेवणार कुठे? त्यांना घर कसे देणार? आधीच भारतात एवढ्या समस्या आहेत. भारतातील हिंदूंचे आधी पाहा, मग बाहेरच्या देशातील हिंदूंची काळजी घ्या.
आम्ही मनाने एकत्र आलो आहोत…
तीन पक्षांचे सरकार टिकणार नाही अशी टीका नेहमीच भाजपकडून केली जाते. त्याचा देखील मुख्यमंत्र्यांनी खरपूस शब्दात समाचार घेतला. आम्ही (शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी) आता एकत्र आलेलो आहोत. मनाने काम करण्यासाठी आम्ही एकत्रित आलो आहोत. हे माझे आणि एकूणच महाराष्ट्रचे वैभव आहे. याच दरम्यान, भाजपवर टीका करताना उद्धव ठाकरेंनी तुकडोजी महाराजांचे अभंग सुद्धा सादर केले. “पाहूणी सौख्य माझे… देवेंद्र तोही लाजे… शांती सदा विराजे… झोपडीत माझ्या…” अर्थातच हे सरकार ऑटो रिक्षा सरकार आणि गोर-गरीबांचे सरकार आहे. बुलेट ट्रेनचे सरकार नाही असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
बोलाची कडी बोलाचाच भात -देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या उत्तरावर समाधानी नसल्याचे सभागृहातील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि हेक्टरी 25 हजार देण्याचे आश्वासन दिले होते. त्याचे काय झाले. मुख्यमंत्री हे सरकार स्थगितीचे सरकार नाही असे म्हणतात. मग, दिलेल्या स्थगितींचे जीआर रद्द करणार का? प्रत्यक्षात या सरकारचे कामकाज म्हणजे बोलाची कडी आणि बोलाचाच भात आहे तो काही शिजत नाही अशा शब्दांमध्ये फडणवीस यांनी सरकारवर प्रहार केला.