युबीए प्रो बास्केटबॉल लीग युबीएच्या दक्षिण विभागातील सेमीफायनल सिरीजमध्ये बंगळूरु बिस्ट संघाची 1-0 अशी आघाडी
गोवा-
युबीएच्या दक्षिण विभागातील बेस्ट ऑफ थ्री सिरीज उपांत्यफेरीतील पहिल्या सामन्यामध्ये बंगळूरु बिस्ट संघाने पुणे पेशवाज संघाला 138-133 असे पराभूत केले.युबीएच्या चौथ्या हंगामातील अजिं्नयपद सिरीजचे सामने गोव्याच्या डॉ. शामा प्रसाद मुखर्जी स्टेडियम येथे 10 ते 16 मार्च 2017 दरम्यान होणार आहेत.
बंगळुरु बिस्ट संघामध्ये विशेष भृगुवंशी, ख्रिस सोलोमन, पलप्रीत ब्रार, विसु पलानी व प्रथम सिंग यांचा समावेश होता.तर, पुणे पेशवाज संघाची मदार अमृतपाल सिंग, पिएरी न्युटन, सिद्धांत शिंदे, नरेंदर ग्रेवल व अर्शप्रीत भुल्लर यांच्या खांद्यावर होती.
पहिल्या क्वॉर्टरपासून बंगळूरु बिस्ट संघाने आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत सुरुवातीलाच 10-0 अशी आघाडी घेतली. पलप्रीत हा अमृतपालवर आढळल्याने त्याच्या पायाला दुखापत झाली व त्याला कोर्टबाहेर जावे लागले.पण, बंगळूरुकडून सोलोमन, विशेष, कैफ व रघुराम यांनी थ्री पॉईंट्सची कमाई करत पहिल्या क्वॉर्टरअखेरीस बंगळूरुला 45-33 अशी आघाडी मिळवून दिली.
दुस-या क्वॉर्टरमध्ये अमृतपाल व न्युटन यांनी पुण्याला चांगली सुरुवात दिली. दुसरीकडे या दोघांनाही रोखण्यासाठी बंगळूरुचे प्रयत्न हे सुरु होते.सोलोमनने बंगळुरुसाठी योगदान दिले.पुण्यासाठी शिंदे व माने यांनी गुणांची भर घातली.बंगळुरुच्या संघाने पहिल्या सत्राच्या शेवटी आपल्या आक्रमक खेळाने पुण्यावर 80-70 अशी आघाडी घेतली होती.बंगळुरुकडून ख्रिस सोलोमनने 39 गुण व विशेषने 22 गुणांची कमाई करत आपली चमक दाखवली.
दुस-या सत्रामध्ये पुण्याच्या अमृतपालने चांगला खेळ करत संघासाठी निर्णायक भुमिका बजावली. पण, बंगळूरु बिस्टच्या विशेष व सोलोमन यांच्या पुढ्यात अमृतपालचे काहीच चालले नाही. त्यामुळे तिस-या क्वॉर्टरअखेरीस अमृतपालने चांगला खेळ करुन देखील बंगळुरु संघाने 109-102 अशी आपली आघाडी कायम ठेवली.
चौथ्या क्वॉर्टरमध्ये पुण्याच्या संघाने आक्रमक भुमिका घेतली व गुण मिळवण्यासाठी आपले प्रयत्न सुरु केले. सामन्याला सहा मिनिटे शिल्लक असताना अमृतपालने चौथा फाऊल केला. दुखापतीमुळे पहिल्या क्वॉर्टरमध्ये बाहेर गेलेला पलप्रीत ब्रार पुन्हा कोर्टवर उतरला. पुण्याच्या संघाला सामन्याला चार मिनिटे शिल्लक असताना 125-123 अशी आघाडी घेण्यात यश मिळाले पण, विशेषने पुन्हा एकदा निर्णायक क्षणी खेळ उंचावत आपली चमक दाखवली.
त्याच्या याच कामगिरीमुळे सामन्याला दोन मिनिटे शिल्लक असताना सामना 129-129 असा बरोबरीत होता.
विशेषने व कैफने प्रत्येकी दोन गुण मिळवले पण, अमृतपालने सामन्याला 53 सेकंद शिल्लक असताना पुन्हा सामना बरोबरीत आणला. आणखीन एकदा फाऊल केल्याने अमृतपालला बाहेर जावे लागले. याचाच फायदा सोलोमन याने घेत संघासाठी गुणांची कमाई करत बंगळूरु बिस्टला 138-133 असा विजय मिळवून दिला.
………………..
-सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू :
ख्रिस सोलोमन ( आंतरराष्ट्रीय), विशेष भृगुवंशी (भारतीय)
– बंगळुरु बिस्ट : 138 (ख्रिस सोलोमन 55 गुण, विशेष भृगुवंशी 44 गुण, कैफ झिआ 11 गुण) वि.वि. पुणे पेशवाज : 133 ( अमृतपाल सिंग 45 गुण, पिएरी न्युटन 38 गुण, नरेंदर ग्रेवल 13 गुण)