पुणे – भवानी पेठेतील प्रभाग क्र. १९ मधील घंगाळे येथील रस्त्याच्या कडेला बनविण्यात आलेल्या पदपथाचे एकच काम दोनदा दाखवून दोनदा पदपथाचे बिल काढण्यात आले आहे. प्रभागातील अनेक कामांमध्ये भ्रष्टाचार करण्यात आला असून याप्रकरणी संबधितांची चौकशी करून कडक कारवाई करावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा काँग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांनी आज पत्रकार परिषदेत दिला.
अविनाश बागवे यांनी सांगितले, की यासंदर्भातील निवेदन महापालिका आयुक्तांना देउन कारवाईची मागणी केली आहे.घंगाळे पथाच्या एका बाजूच्या पदपथाचे काम मार्च महिन्यांत शेवटच्या टप्प्यात झाले होते.स्थानीक नगरसेवकाच्या निधितून हे काम करण्यात आले होते.
महापौर निधीतून मिळालेल्या १० लाख रुपयांच्या निधीतून हे काम करण्यात आले होते.मात्र, त्याच कालावधीत रस्त्याच्या दुसर्या बाजूचे अर्धवट व निकृष्ट कामकाज करण्यात आल्याचे दाखवून बिल काढण्यात आले. हे काम याच प्रभागातील दुसर्या नगरसेवकाच्या निधीतून करण्यात आल्याचे दाखवून कामाच्या बिलासोबत महापौर निधीतून करण्यात आलेल्या बिलाचे फोटो जोडण्यात आले.हा प्रकार दिवसाढवळ्या महापालिकेच्या तिजोरीवर टाकण्यात आलेला दरोडा आहे. महापालिका आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी करून दोन दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. संबधितांवर तत्काळ कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा बागवे यांनी दिला आहे.

