पुणे -महानगरपालिकेने महिन्याच्या शेवटच्या सोमवारी पीएमपीतून मोफत प्रवास योजनेच्या अंमलबजावणीबाबत चर्चा करण्यासाठी गेलेले काँग्रेस नगरसेवक आबा बागूल आणि पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) अध्यक्ष तुकाराम मुंढे यांच्यात सोमवारी शाब्दिक वाद झाला ,या वेळी बागूल यांनी कर्मचाऱ्यांना धमकावून, मुंढे यांनाही दमबाजी केल्याचे पीएमपी प्रशासनाचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर पीएमपी प्रशासनाच्या तक्रारीवरून बागूल यांच्या विरोधात स्वारगेट पोलिस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.आबा बागुल यांना १५ मिनिटे आपल्या कार्यालयाबाहेर बसवून नंतर त्यांना मुंडे यांनी आत बोलाविल्याचा प्रकार हि यामुळे उघडकीस आला आहे .या पूर्वी महापौर मुक्ता टिळक ,स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्याशी खटके उडाल्यानंतर वाद वाढू नये म्हणून सत्ताधारी असलेल्या भाजपाने त्यावर पडदा टाकला होता.तेव्हा खुद्द मुख्यमंत्री च मुंडेंच्या पाठीशी असल्याचे बोलले जात होते . आता मुंडे यांचा कॉंग्रेस पक्षातील ज्येष्ठ नगरसेवक आबा बागुलांशी वाद झाला आहे . अर्थात बागुलांना पक्षांतर्गत विरोध आहेच . पण अशा घटनेने सर्वच नगरसेवक हबकून गेले आहेत . बस बाबत कोणतीही मागणी मुंडे यांच्याकडे घेवून जायला आता कोणी धजावेल असे चित्र नाही .
या बाबत मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी बागूल हे पीएमपीच्या स्वारगेट येथील कार्यालयात गेले होते. पीएमपीच्या प्रवाशांना एक दिवसीय मोफत पास देण्याची योजना चर्चेत होती. त्या योजनेच्या अंमलबजावणीबाबत चर्चा करण्यासाठी बागूल गेले होते. त्यावेळी मुंढे आणि बागुल यांच्यातील चर्चेच रुपांरत वादात झाले. त्या वेळी बागूल यांनी मुंढे यांना कार्यकर्त्यांसह उपोषण करण्याची धमकी दिली. या पार्श्वभूमीवर पीएमपी प्रशासनाने स्वारगेट पोलिस स्टेशनमध्ये सुरक्षा रक्षकामार्फत तक्रारीचे पत्र पाठविले.
या बाबत बागुल म्हणाले शहराची सार्वजनिक वाहतूक सेवा असलेल्या पीएमपीकडे नागरिक आकर्षित व्हावेत आणि खासगी वाहने न वापरता सार्वजनिक वाहतूक सेवेचा अधिकाधिक वापर वाढावा यासाठी पुणे महानगरपालिकेने महिन्याच्या शेवटच्या सोमवारी पीएमपीतून मोफत प्रवासासाठी पालिकेच्या मुख्यसभेने मान्य केलेल्या ठरावाची अंमलबजावणी आजतागायत झालेली नाही.
विशेष म्हणजे पीएमपीला तोट्यातून वाचविण्यासाठी तसेच या योजनेचा आर्थिक भार पडू नये यासाठी सुमारे पावणे दोन कोटी रुपयेही महापालिका पीएमपीएमएलला अदा करणार आहे. त्यासाठीच महिन्यातून शेवटच्या सोमवारी पीएमपीतुन मोफत प्रवास हा सार्वजनिक वाहतुकीला चालना देणारा ठरणार आहे असे असताना पीएमपी प्रशासनाची भूमिकाच नकारात्मक असल्याचे वेळोवेळी दिलेल्या निवेदनाला कोणतीही दखल न दिल्याने स्पष्ट होत आहे.
त्यामुळे करदात्या पुणेकरांच्या रकमेची लूट होऊ नये आणि पीएमपीचे तूट कमी करण्यासाठी वेळ पडली तर रस्त्यावर उतरण्यास मागे पुढे पाहणार नाही, पुणेकरांच्या हितासाठी अगदी पीएमपीसेवा रोखून आंदोलन होईल असा इशाराही आबा बागुल यांनी दिला आहे.