पुणे : भारत माता की जय… च्या जयघोषात हातात तिरंगी ध्वज घेऊन श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरापासून तिरंगा रॅली काढण्यात आली. दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेत महाआरती करून रॅलीला प्रारंभ झाला. देशभक्तीने भारलेल्या वातावरणात सुरु झालेल्या रॅलीमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने हातात तिरंगा ध्वज घेत सहभाग घेतला.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख, सुवर्णयुग सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि पुणे मनपा स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांच्यातर्फे तिरंगा रॅली चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये राज्याचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील, आयोजक हेमंत रासने, कसबा मतदारसंघाचे अध्यक्ष प्रमोद कोंढरे, माजी नगरसेवक अजय खेडेकर, राजेश येनपुरे, अनिल बेलकर, किरण जगदाळे, परेश मेहेंदळे, सौरभ रायकर, प्रकाश चव्हाण, यतिश रासने, नितीन पंडित, विकास पवार, उदय लेले, निलेश कदम आदींसह शेकडो नागरिक, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांची महाआरती झाल्यानंतर बेलबाग चौकामार्गे मंडईतील लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅली पुढे मार्गस्थ झाली. तुळशीबाग राममंदिर व तुळशीबाग गणपती मंदिरात दर्शन घेत पुढे लक्ष्मी रस्त्यावरील गुरुजी तालीम मंडळाजवळ रॅलीचा समारोप झाला. यादरम्यान पथारी व्यावसायिक व तुळशीबागेतील व्यापा-यांना देखील तिरंगी ध्वज देण्यात आले.

हेमंत रासने म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार हर घर तिरंगा अभियान राबविण्यात येत आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यामध्ये पुण्याच्या मध्यवर्ती भागातील अनेक स्वातंत्र्यसेनानींचा सहभाग होता. अनेक ऐतिहासिक ठिकाणे देखील या परिसरात आहेत. त्यामुळे त्या प्रत्येक ठिकाणाला मानवंदना देत ही रॅली काढण्यात आली. तसेच नागरिक व व्यापारी वर्गाला तिरंगी ध्वजाचे वाटप देखील करण्यात आले.