देवाच्या कृपेने आपल्यावरील मोठ्ठं संकट टळलं. देवाचे आभार मानून त्याला नमस्कार करून पुन्हा प्रवास चालू झाला. आताची टेम्पो ट्रॅव्हलर अगदी साधी १८ सीटर गाडी होती. कुठे भारी इंटेरिअर नव्हते की लाईटिंग नव्हती. दुपारचे ३ वाजून गेले होते, जेवणाची वेळ टळून गेली होती. भूक लागली होती आणि नव्हती ही. सगळ्यांच्या मनात संमिश्र भावना होती. थोड्याच अंतरावर एक हॉटेल होते. तिथे जेवणासाठी थांबलो. वेगळ्या विषयांवर गप्पा मारल्या आणि सर्वांनी ठरवले की आता अपघाताचा विषय काढायचा नाही कारण नुकतीच प्रवासाला सुरुवात केली होती. परत गाडीत चढलो ते एका वेगळा मूड क्रिएट करून. मुन्नारला पोहोचायला खूपच उशीर झाला. रात्री ९ च्या सुमारास क्लब महिंद्रा मुन्नार रिसॉर्टला पोहोचलो. थंडी बोचरी होती. रिसॉर्ट मुन्नार शहरापासून लांब होते. टी गार्डन अवतीभवती असलेले हे लेक व्ह्यू रिसॉर्ट आहे. सकाळी सकाळी रूमच्या बाल्कनीतून नयनरम्य देखावा आणि उगवत्या दिनकराचे दर्शन झाले. आज मुन्नार पाहायचे असे ठरवून बाहेर पडलो. सभोवताली नजर जाईल तिकडे चहाचे मळेच मळे आणि वर नीरभ्र, स्वच्छ आकाश. आल्हादायक वातावरण आणि शुद्ध हवा. अशातच मुस्तफाने गाडी थांबवली ती अशाच एका मनभावन लोकेशनवर…लोकहार्ट टी प्लांटेशन. त्या चहाच्या मळ्यात आम्ही सर्व मनसोक्त बागडलो. नंतर पेटपूजा करायची म्हणून मुन्नार शहरातील प्रसिद्ध ‘गुरु ढाब्या’ला भेट दिली.
मुन्नारमधील ‘एरावीकुलम नॅशनल पार्क’ला भेट देण्याचे ठरवले. हे नॅशनल पार्क निलगिरी तहर (जंगली बकरी) या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. तसेच येथून दिसणारा मुन्नारचा देखावा अप्रतिम आहे. मुन्नारमधील आमच्यासाठी खास आकर्षण होते ते ‘पुनर्जनि ट्रॅडिशनल व्हिलेज’ला भेट देणे. आपली परंपरा जपण्यासाठी या ठिकाणी रोज नवरासा क्लासिकल फ्युजन शोचे आयोजन केले जाते. यात कथकली, भरतनाट्यम, मोहिनीअट्टम, थेय्यम हे शास्त्रीय नृत्य प्रकार सादर केले जातात. तर कलारी शोमध्ये पारंपरिक मार्शल आर्ट्सचे खेळ दाखवले जातात. पुनर्जनिच्या मार्शल आर्ट परफॉर्म करणाऱ्या उंनीकुमारने सांगितले की १५ वर्षांचा असल्यापासून तो ही मार्शल आर्ट्सची कला शिकतो आहे. ४००० वर्षं प्राचीन अशी ही मार्शल आर्टस् कला आहे. गेली १० वर्षं आता तोही शिकवतो आहे. मोहिनीअट्टम सादर करणाऱ्या लक्ष्मी कलामंडळमने तिच्या मोहिनीअट्टम या नृत्य प्रकारची माहिती आम्हाला दिली. मुन्नारला जाणाऱ्या सर्वांनी प्रेक्षणीय स्थळांबरोबर पुनर्जनि ट्रॅडिशनल व्हिलेजला आवर्जून भेट द्यावी आणि त्यांच्या पारंपरिकतेला अनुभवावे.
त्यानंतर बघायचा राहिला होता तो सन राईझ पॉईंट. महिंद्रा रिसॉर्टच्या ट्रॅव्हल डेस्कच्या प्रतिनिधीकडून याबद्दल भरभरून वर्णन करण्यात आले आहे. म्हणून आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला की जाऊयाच उद्या सकाळी. आणि मग आल्लेपीला जायला निघूया. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून ४.३० ला आम्ही तयार झालो. कार्थिक याच्या जीपमधून आम्ही जाणार होतो. तिकडे आपली गाडी नेता येत नाही. तिकडच्या स्थानिक लोकांचीच गाडी बुक करावी लागते. या ठिकाणी गेलात की तुम्ही ढगात असाल असेच तुम्हाला वाटेल. तो जो सूर्य उगविण्याचा क्षण आहे तो खूपच सॉल्लिड आहे. त्याच्या मोडक्या तोडक्या भाषेमध्ये कार्थिक रसभरीत वर्णन करीत होता.
सर्व बाजूंनी काळाकुट्ट अंधार होता. एक एक जीप आता आमच्या जीपच्या मागे पुढे दिसू लागली होती. अरे व्वा! बरेच जण जातात तर हा पॉईंट बघायला, असं मी मनात म्हणत होते. या पॉईंटकडे जाणारा रस्ता एका खाजगी चहाच्या मळ्यातून जात होता. त्यासाठी तिकडे प्रवेश करताना चेकिंग केले जाते. रस्ता थोडा खराब असेल असं सुरूवातीला वाटले. पण जीप जसजशी पुढे जात होती तसतसे पूर्ण शरीराला जोरजोरात हिसके बसत होते. एकतर निमुळता रस्ता, एका बाजूला चहाचे मळे तर दुसऱ्या बाजूला दरी. आमच्या मनातील भीती घालविण्यासाठी जीपचा ड्रायव्हर आमच्याशी सतत गप्पा मारत होता. थोड्या अंतराने असा अगदीच खराब रस्ता आला की जणू जीप हेलकावे खात होती. ड्रायव्हरने हुशारीने आमचं लक्ष दुसरीकडे वेधून घेण्यासाठी १९८० च्या दशकातील रोमँटिक हिंदी गाणी लावली. मनात प्रचंड भीती दाटून आली होती. त्या क्षणी ठरवले की एवढा द्राविडी प्राणायाम करून या पुढे सन राईझ पॉईंट बघायला काही जायचे नाही.(मानेचे, पाठीचे, आणि कमरेचे दुखणे असणाऱ्यांनी हा पॉईंट बघायला जाण्याचा मोह टाळावा.) सहज घडणारे सूर्यदर्शनच काय ते पदरात घ्यायचे. शेवटी दीड तासाच्या प्रवासाने त्या पॉईंटच्या उंचीवर पोहोचलो. प्रचंड धुकं दाटून आलं होतं. दवबिंदू अंगावर पडत होते. गार वारं सुटलं होतं. दोन्ही हातांनी स्वतःला लपेटून घेतलं तरी थंडी कुठूनही अंगाला झोंबत होती. त्या पॉईंटच्या टोकावर चालत चालत आम्ही पोहोचलो. खूप गर्दी होती. दोन्ही बाजूस खोल दरी. आम्ही जास्त पुढे न जाण्याचा निर्णय घेतला. अगदी आपल्या जवळच ढग आहेत असा भास होत होता. धुकं असल्यामुळे सूर्यदर्शन काही झालं नाही. पण अनुभवलेला तो क्षण स्वर्गीय सुखाचा आनंद देऊन गेला.
तो क्षण अनुभवून आता परत त्या भयंकर प्रवासाचा अनुभव घ्यायचा या विचाराने पोटात गोळा आला. ड्रायव्हरने बहुदा ते चेहऱ्यावरील भाव ओळखले असावेत. पटकन तो म्हणाला. “ये रास्ता ऐसा हे कि केरल में आते हो तो नॅचरल बॉडी मसाज हो जाता हें, अभि मी आपको ऐसी जगा ले जाऊंगा कि आप सब लोग खुश हो जायेंगे.” त्याचं हे संभाषण ऐकून मनात म्हटलं, याला काय जातंय बोलायला. इकडे आम्ही जीपमध्ये जीव मुठीत धरून बसलो होतो. आता अजून कुठे घेऊन जातोय कुणास ठाऊक. जीप परत त्याच खडकाळ रस्त्याने जाऊ लागली आणि नुकतंच उजाडू लागलं होतं. त्यामुळे आपण कुठल्या रस्त्याने आलो होतो ते दिसू लागलं. सभोवती चहाच्या मळ्याने लांबच लांब आच्छादलेले डोंगर खूपच सुंदर दिसत होते. एवढी हिरवाई बघायची सवय नाही ना. दाटलेलं धुकं आणि आता त्यातून तांबडं फुटू लागलं होतं. एका डोंगर उतरणीवर त्याने जीप थांबवली आणि म्हणाला, अभि यहा से नजारा देखो. चहुबाजूंनी हिरवे गालीचेच जणू पांघरले होते. वर शुभ्र आकाश, वाहत जाणारे मोठाले ढग. त्या हिरवाईतून दिसणारी २-४ घरं. अगदी सिनेमात असतं तसाच सिन डोळ्यांसमोर होता. त्या क्षणाचे आणि सौंदर्याचे वर्णन करायला शब्दही अपुरे पडतील. डोळे गच्च मिटून ते सौंदर्य डोळ्यात साठवून घेतले. कार्थिकका जादू चल गया! मग त्याने आम्हाला सांगितले की सांगतो तसे तुम्ही उभे राहा, मी फोटो काढतो. एक एक ट्रिक वापरून तो आमचे फोटो काढत होता. एखाद्याला उपजतच कॅमेराचा अँगेल असावा तसं काहीसं कार्थिकच्या बाबतीत होतं. एकदम छान आमचे फोटो काढले. परतीच्या वाटेवरील भीती आता कुठच्या कुठे पळून गेली होती. मस्त मूडमध्ये रिसॉर्टवर पोहोचलो. आता परत निघायचे होते. पुढचे डेस्टिनेशन होते हॉटेल रमाडा- आल्लेपी… (क्रमशः)
- पूर्णिमा नार्वेकर, दहिसर

