तौक्ते चक्रीवादळाने आता रौद्र रुप धारण करण्यास सुरुवात केली आहे. या वादळामुळे कोकणातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. चक्रीवादळाचा वेग यापेक्षा जास्त वाढू शकतो अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. हवामान विभागाकडून सिंधुदुर्गात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.यासोबतच या चक्रिवादळामुळे गोव्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये वीज कनेक्शन कट झाले आहे.
या पार्श्वभूमीवर खबरदारीची उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी प्रत्येक तालुक्याचे तहसिलदार गटविकास अधिकारी त्याचप्रमाणे नगरपालिका मुख्याधिकारी यांना काही विशेष सूचना दिल्या आहेत.
तर केरळच्या अनेक जिल्ह्यामध्ये तुफान पाऊस सुरू आहे.हवामान विभागानुसार, हे चक्रीवादळ गोव्याच्या किनारपट्टीला धडकले आहे. आता गुजरातकडे वेगाने पुढे सरकत आहे. यामुळे मुंबईसह उत्तर कोणकणात काही ठिकाणी तुफान वाऱ्यासह मुसळधार पाऊस होत आहे.गोव्यात तौक्ते वादळामुळे दाणादाण उडाली आहे. अनेक झाडेही उन्मळून पडली आहेत. हे वादळ आता मुंबईच्या दिशेने पुढे सरकत आहे.

तौते चक्रीवादळ येत्या चोवीस तासात अधिक तीव्र होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्यानं व्यक्त केली आहे. सध्या हे चक्रिवादळ मुंबईच्या दक्षिणेस 450 किलोमीटरवर असून पुढे गुजरातच्या दक्षिण-दक्षिणपूर्व दिशेला 840 किमी अंतरावर आहे. ते येत्या चोवीस तासात गुजरातकडे सरकरण्याची शक्यताही हवामान खात्यानं व्यक्त केली आहे.
कोकण किनारपट्टी आणि गोव्यात 16 मे रोजी काही भागात तसेच घाटमाथ्यावर मूसळधार ते अतिमूसळधार तर उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी 17 मे रोजी मूसळधार पाऊस कोसळण्याचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या दक्षिण भागात 16 मे रोजी ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहतील तर 17 मे पासून 18 मेच्या सकाळपर्यंत किनारपट्टीच्या उत्तर भागात वाऱ्याचा वेग ताशी 65 ते 75 किमी असू शकतो. तो वाढत तो ताशी 85 किलोमीटर इतका वाढू शकतो असा इशाराही देण्यात आला आहे.
महाराष्ट्राची किनारपट्टी, खासकरुन किनारपट्टीच्या उत्तरेकडच्या भागातला समुद्र येत्या चोवीस तासात खवळलेला असेल. मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये आणि जे मच्छिमार समुद्रात असतील त्यांनी तातडीनं किनाऱ्यावर यावं अशी सूचना देण्यात आली आहे.
पुण्यात वादळी वारा आणि पाऊस यामुळे अग्निशमन दलाकडे शहराच्या विविध भागात काल रात्री ९ ते आज दुपारी ४ वाजेपर्यंत झाडपडीच्या एकूण ३१ घटनांची नोंद झाली असून सुदैवानं कोणीही जखमी झाल्याची नोंद नाही. अग्निशमन दलाच्या प्रमुखांकडून सर्व अधिकारी जवानांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


