मुंबई- राज्यात येत्या मार्चमध्ये भाजपची सत्ता येणार आहे असे भाकित नारायण राणेंनी वर्तवले. त्यावर प्रतिक्रिया देताना, “काही लोकांकडे 23 वर्षांत नवसाच्या इतक्या कोंबड्या जमल्या की आता ‘त्या’ कोंबड्यांसाठी सरकार बनवण्याचं भाकीत करावं लागतंय…” असा टोला नवाब मलिकांनी लगावला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी असे म्हटले आहे कि, महाराष्ट्रात सरकार महाविकास आघाडीचे स्थापित झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी महिना-दोन महिन्याला सरकार पडणार अशा भविष्यवाण्या सुरू केल्या होत्या. यानंतर भाकिते वर्तवण्याची जबाबदारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी घेतली. झोपेतून उठताच या दिवशी सरकार पडणार, या दिवशी भाजपची सत्ता येणार अशी विधाने ते करू लागले. आता हीच जबाबदारी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी घेतलेली दिसते.याबाबत मलिक यांनी ट्वीट करूनही प्रतिक्रिया नोंदविली आहे.
भविष्यवाण्या करून, शाप देऊन , नवसाने सरकार पडणार असे कुणी समजत असेल तर हा त्यांचा निव्वळ गैरसमज आहे. आमचे सरकार पूर्ण पाच वर्षे टिकणार आहे.असेही मलिक यांनी म्हटले आहे.

