बेळगावात आज सकाळपासून पोलिसांनी नाकेबंदी करुन मराठी भाषिकांची मुस्कटदाबी करण्यास सुरुवात केली आहे. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी आयोजित केलेल्या काळ्या दिनाच्या धरणे आंदोलनात जनता पोहोचू नये यासाठी शहरातील विविध भागात नाकेबंदी करण्यात आली असून लोकांची कसून चौकशी करण्यात येत आहे. इतकेच नाही तर काळे कपडे घालून बाहेर पडणाऱ्यांना जाब विचारला जात आहे.
काळ्या दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील माध्यम प्रतिनिधी या ठिकाणी दाखल झाले होते. मात्र पोलिसांनी त्यांच्याकडे असणारे बुम खेचून घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना ही मज्जाव करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे माध्यमांची देखील दडपशाही पोलिसांकडून सुरू असल्याचे दिसून येत आहे. माध्यमांच्या या दडपशाहीचा निषेध पत्रकार वर्गाकडून करण्यात आला
बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समिती दरवर्षी 1 नोव्हेंबर हा दिवस काळा दिन म्हणून पाळते.भाषावर प्रांतरचनेच्या बेळगावसह सीमावर्ती मराठीबहुल भाग कर्नाटकात डांबल्याच्या निषेधार्थ हा दिवस पाळला जातो. या दिवशी निषेध फेरी व सभाही होतात. कोरोना महामारीमुळे यंदाची निषेध सायकल फेरी आणि जाहीर सभा रद्द करण्यात आली. त्याऐवजी मराठा मंदिर येथे धरणे आंदोलन प्रशासनाने परवानगी दिली. पण ही परवानगी देत असताना लोकांनी आंदोलन स्थळांपर्यंत पोचू नये, यासाठी पोलिसांकडून दबावतंत्राचा वापर करण्यात येत आहे. एकावेळी केवळ ५० लोक आंदोलनात सहभागी होणार आहेत. टप्प्याने आंदोलनात सहभागी होण्यासाठी येणाऱ्या मराठी भाषिकांची कोंडी केली जात आहे.
आज रविवारी सकाळपासूनच शहरातील विविध मार्गांवर नाकाबंदी करण्यात आली आहे. मराठा मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यांवर वाहतुकीला बंदी घातली आहे. लोकांची कसून चौकशी करण्यात येत आहे. काळे कपडे घातलेल्या लोकांना जाब विचारण्यात येत आहे. पोलिसांच्या या मुस्कटदाबीचा तीव्र संताप व्यक्त होत आहे.

