नवी दिल्ली – आर्थिक संकटात अडकलेल्या येस बँकेच्या ग्राहकांत सध्या प्रचंड धास्ती आहे. येस बँकेच्या शाखा तसेच एटीएमवर शुक्रवारी ग्राहकांच्या लांब रांगा होत्या. गुरुवारी रात्रीच बँकेच्या बहुतांश एटीएममध्ये खडखडाट झाला. लोकांचा रोष पाहता मुंबईतील सर्व शाखांवर पोलिस तैनात करण्यात आले अाहेत. आरबीआयने या बँकेतून ५० हजारांहून अधिक रक्कम काढण्यास ३ एप्रिलपर्यंत मनाई केली होती. त्यामुळे ग्राहकांमध्ये अधिकच गोंधळ उडाला. येस बँकेच्या संकटात तिरुपती देवस्थान कसेबसे वाचले, कारण ट्रस्टने गेल्या महिन्यातच १३०० कोटी काढून घेतले होते. मात्र, भगवान जगन्नाथांचे ५९२ कोटी अडकले. अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या, “सर्व पैसा सुरक्षित आहे. आरबीआयने येस बँकेसाठी मदत योजनाही सादर केली आहे.’ येस बँक संकटामुळे ऑनलाइन पेमेंट कंपनी फोनपेच्या सेवाही ठप्प.
आरबीआयच्या योजनेतील ५ मुख्य मुद्दे
१. एसबीआय २४५० कोटींची गुंतवणूक करून येस बँकेत ४९ टक्के मालकी खरेदी करेल.
२. येस बँकेचे अधिकृत भांडवल ५० हजार कोटी निश्चित केले आहे. प्रत्येक शेअरचे मूल्य २ रु.राहील.
३. नवीन बोर्ड होईल. गुंतवणूकदार बँक म्हणजे एसबीआय संचालक मंडळात दोन सदस्य नेमू शकेल.
४. पुनर्बांधणी योजनेत एखाद्या खातेधारकाच्या मिळकतीत बदल झाला तर भरपाई मिळणार नाही.
५. येस बँकेत काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या सेवा पूर्वीप्रमाणेच कायम राहतील.
बाजारातील कलानुसार तोडगा : आरबीआय
आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले, आम्ही जे ३० दिवस दिले आहेत ती कमाल मुदत अाहे. या समस्येवर बाजारावर आधारित तोडगा काढला जाईल.
- ‘सर्व खातेधारकाचे पैसे सुरक्षित, बँकेला वाचवण्यासाठी सरकार आणि आरबीआय एकत्र काम करत आहे’- निर्मला सीतारमण
- – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की, येस बँकेला वाचवण्यासाठी सरकार आणि आरबीआय एकत्र काम करत आहेत. त्यांनी बँकेच्या प्रत्येक खातेधारकाला विश्वास दिला आहे की, त्यांचे पैसे सुरक्षित आहेत आणि त्या आरबीआयच्या सतत संपर्कात आहेत. सरकार बँकेसाठी लवकरच रिझोल्युशन प्लॅन घेऊन येईल. मागील दोन महिन्यांपासून त्या वैयक्तिकपणे ही परिस्थिती पाहात आहेत. आता घेतलेला निर्णय सर्वांच्या हिताचा आहे. तसेच, त्या आरबीआयसोबत चर्चा करुन लवकर प्रकरणातून मार्ग काढली, असेही त्या म्हणाल्या.
- येस बँकेच्या समस्येचे निराकरण लवकरच केले जाईल : आरबीआय गव्हर्नर
- आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास शुक्रवारी म्हणाले होते की, बँकेतील या मुद्द्यांचे निराकरण लवकरच केले जाईल. यासाठी 30 यासाठी दिवसांचा कालावधी निश्चित केला गेला आहे. रिझर्व्ह बँक यावर लवकरच कारवाई करेल. ते म्हणाले की, येस बँकेवर बंदी घालण्याचा निर्णय कोणत्याही एका घटकाच्या आधारे घेतलेला नाही. हा निर्णय देशातील बँकिंग आणि आर्थिक व्यवस्थेची सुरक्षा आणि स्थिरता अबाधित ठेवण्यासाठी घेतला गेला आहे.
ग्राहकांचे प्रश्न, तज्ज्ञांची उत्तरे
येस बँकेचा चेक बाउन्स होईल, पगार खाते असेल तर तत्काळ बँक बदलायला हवी
५ लाख रुपयांपर्यंत पैसे बुडणार नाहीत ही अर्थसंकल्पातील घोषणा येस बँकेसाठी लागू होईल?
आताच नाही. ही व्यवस्था दिवाळखोरीच्या स्थितीत लागू असेल. आरबीआयने बँकेला फेल ठरवले तरच ही अट लागू. पैसे काढण्यावरील बंधने बँक वाचवण्याचा प्रयत्न आहे.
येस बँकेतील पगाराच्या खात्यांचे काय?
हे खातेदारही ५० हजारांपेक्षा अधिक पैसे काढू शकणार नाहीत. त्यांनी तत्काळ बँक बदलली पाहिजे.
ईएमआय, एसआयपी इत्यादीवर परिणाम काय?
सर्व प्रकारच्या व्यवहारांवर बंधने आहेत. पेमेंट ५० हजारांपेक्षा कमी असेल तर परिणाम नाही.
यूपीआय, एनईएफटी इत्यादी व्यवहार शक्य?
नाही. येस बँकेत होणाऱ्या सर्व व्यवहारांवर सध्या बंधने लावली आहेत.
इतर बँकांच्या एटीएममधून पैसे निघतील?
नाही. कारण, येस बँकेचे एटीएम बंद आहेत. इतर एटीएमवर येस बँकेचे कार्ड चालणार नाही. त्यासाठी शाखेतच जावे लागेल.
चेक क्लिअरिंगला असतील तर काय होईल?
येस बँकेचे चेक बाउन्स होतील.
ही समस्या पीएमसी बँकेसारखी आहे की वेगळी?
पीएमसी बँक समस्या वेगळी होती. तेथे गुंतवणूकदारांचा विश्वासघात झाला होता. लोकांनी रक्कम काढून लपवली होती. दुसरे म्हणजे, येस बँकेसाठी पैसे काढण्याची मर्यादा ५० हजार रुपये आहे. पीएमसीसाठी ही मर्यादा १ हजार रुपयांपासून सुरू झाली होती. येस बँकेसाठी मॉरेटोरियम पीरियड ३० दिवसांचा आहे. पीएमसीसाठी तो ६ महिन्यांचा होता.
आता येस बँकेचे भविष्य काय?
मदत योजनेच्या यशावर हे अवलंबून असेल. दोन मार्ग आहेत. एक तर ही बँक सावरेल, पण यासाठी बँकेत गुंतवणूक हवी. दुसरा मार्ग म्हणजे या बँकेचे इतर एखाद्या बँकेत विलीनीकरण व्हावे

