मुंबई-मुंबईत 26/11 सारखा भयंकर हल्ला करण्याच्या धमकीचा मेसेज मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला प्राप्त झाला आहे. हा मेसेज पाकिस्तानातून आल्याची माहिती आहे. धमकी देणाऱ्याने स्वतः तशी माहिती दिली आहे. या मेसेजविषयी अद्याप पोलिसांचे स्पष्टीकरण आले नाही. पण यामुळे मुंबईच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
काय म्हणाला धमकी देणारा?
‘आम्ही मुंबईला पुन्हा एकदा उडवण्याची तयारी केली आहे. यावेळीही 26/11 सारखा हल्ला केला जाईल. मी पाकिस्तानातून बोलत आहे. तुमचे काही भारतीयही आमच्यासोबत आहेत. त्यांचीही मुंबईला उडवण्याची इच्छा आहे. या हल्ल्यामुळे 26/11 हल्ल्याच्या स्मृती जागृत होतील. ही धमकी नाही याची प्रचिती तुम्हाला लवकरच येईल.’
‘माझे लोकेशन पाकमध्ये ट्रेस होईल. पण काम मुंबईत होईल. आमचा कोणताही ठिकाणा नसतो. त्यामुळे लोकेशन तुम्हाला आऊट ऑफ कंट्री ट्रेस होईल. उदयपूरसारखा शीर धडावेगळे करण्याचाही हल्ला होऊ शकतो,’ असे मेसेज करणाऱ्याने म्हटले आहे.
“मुंबईवर २६/११ सारखा हल्ला करण्याची धमकी देणारा संदेश वाहतूक नियंत्रण विभागाच्या व्हॉट्सअॅप नंबरवर आला आहे. हा संदेश पाकिस्तानमधील मोबाईल क्रमांकावरून आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. एकूण ६ जण हा हल्ला करणार असल्याचं संदेशात नमूद केलं आहे. यासंदर्भातला तपास सुरू आहे”, अशी माहिती मुंबई पोलिसातील सूत्रांनी दिल्याचं ट्वीट एएनआयनं केलं आहे.