मुंबई- शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशान्वये आमदार सुनील प्रभू यांच्याकडून व्हीप जारी जारी करण्यात आले आहे. महाविकास आघाडीने विधानसभा अध्यक्षपदासाठी शिवसेनेचे निष्ठावंत राजन साळवी यांनी उमेदवारी दिली असून, साळवी यांनाच मतदान करा, असे आदेश शिवसेना आमदारांना देण्यात आले आहे. आम्ही शिवसेनेतच आहोत असे म्हणणाऱ्या बंडखोर आमदारांनाही हा व्हीप जारी करण्यात आला आहे . यामुळे आता शिंदे सरकारची परीक्षा होणार आहे. जे या व्हिपचे पालन करणार नाहीत ते बंडखोर म्हणून सिद्ध होतील आणि त्यांची आमदारकी रद्द होईल असे स्पष्ट आहे यावर मात करण्यासाठी शिंदे आणि त्यांचे सध्याचे नेते फडणवीस काय निर्णय घेतील , त्यांची आमदारकी कशी वाचवतील हे बहुधा संध्याकाळी होणार्या बैठकीत ठरण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या 40 हून अधिक आमदारांनी शिवसेनेतून बंडखोरी केली होती. त्यामुळे राज्यात सत्तांतर झाले आहे. एकनाथ शिंदेंनी भाजपसोबत युती केली असून, शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उप मुख्यमंत्री झाले आहेत. राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर आता विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर ही जागा रिक्त ठेवण्यात आली होती. मात्र, आता विधानसभा अध्यक्षपदाची उद्या निवडणूक होणार आहे. त्यासाठी शिवसेनेने व्हीप जारी केला असून, बंडखोरी आमदार शिवसेनेचा आदेश मानणार का? हे पाहावे लागणार आहे. उद्या सभागृहामध्ये शिंदे गट आणि शिवसेना गट आमने-सामने पाहायला मिळणार आहे. कारण, बंडखोर आमदार म्हणत आहेत की, आमचे नेते एकनाथ शिंदे हेच आहेत.
शिंदे सरकारची खरी परीक्षा रविवारी
अध्यक्षपदाची निवड झाल्यानंतर विश्वासदर्शक ठराव मांडला जाणार आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सरकारनं बाजी मारली तर शिंदे सरकारचे विधानसभेतील बहुमत सिद्ध होईल. त्यानंतर विश्वासदर्शक ठराव ही औपचारिकता असेल. त्यामुळे शिंदे सरकारची खरी परीक्षा रविवारी होणार आहे. या सरकारला कोणत्याही परिस्थितीमध्ये विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकावी लागेल.

