बलात्काराच्या आरोपावर बाजू मांडली
पुणे- शिवसेनेचे उपनेते रघुनाथ कुचिक म्हणाले, “मला आणि माझ्या कुटुंबीयांना बदनाम करण्यासाठी एक राजकीय षडयंत्र, हनी ट्रॅपसारखे प्रकरण तयार करुन हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसंच हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार असून माझे कामगार क्षेत्रातील काम आणि माझी अनेक वर्षांची राजकीय प्रतिमा मलिन करण्याचा हा प्रयत्न आहे.”
माझा तपास यंत्रणांवर पूर्ण विश्वास असल्याचेही रघुनाथ कुचिक म्हणाले. “मला पूर्ण खात्री आहे, की तपास यंत्रणा या प्रकरणाचा संपूर्ण तपास करतील आणि मला न्याय मिळवू देतील. तसेच याबाबत आज खटला दाखल झाल्याने मी आज जास्त काही बोलणार नाही, मात्र माझी कायदेशीर टीम काम करत असून पुढील एक ते दोन दिवसांमध्ये याबाबत कागदपत्रांसह सविस्तर बाजू मांडणार” असे कुचिक यांनी सांगितले.एका 24 वर्षीय तरुणीने कुचिक यांच्या विरोधात तक्रार दिली होती. लग्नाचं आमिष दाखवून कुचिक यांनी शारिरीक संबंध ठेवले आणि गर्भवती राहिल्यानंतर जीवे मारण्याची धमकी देत जबरदस्तीनं गर्भपात करण्यास भाग पाडलं, असा आरोप या तरुणीनं तक्रारीत केला होता. यावर आता रघुनाथ कुचिक यांनी त्यांच्याविरोधातील आरोपावर प्रतिक्रिया दिली आहे.

