१५ वा थर्ड आय आशियायी चित्रपट महोत्सव १५ डिसेंबर ते २२ डिसेंबर दरम्यान रंगणार असून १५ डिसेंबरला या महोत्सवाचा पडदा उघडणार आहे. उत्तर प्रदेशचे राज्यपाल मा. राम नाईक यांच्या हस्ते रविंद्र नाट्यमंदिराच्या मिनी थिएटरमध्ये सायंकाळी ७ वाजता महोत्सवाचा शानदार उदघाटन सोहळा होणार असून, प्रसिद्ध ज्येष्ठ दिग्दर्शक गोविंद निहलानी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. तसेच यावेळी पुण्याच्या आशय फिल्म क्लबचे संस्थापक सेक्रेटरी सतीश जकातदार यांना ‘सत्यजित राय स्मृती पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे.
महोत्सवांतर्गत १६ डिसेंबरपासून दररोज पाच चित्रपट दाखवले जातील. त्याशिवाय महोत्सवात लघुपट चित्रपटांची स्पर्धा ही आयोजित करण्यात आली आहे. महोत्सवात इराण, नेपाळ, जपान बांगलादेश, कोरिया, व्हिएतनाम, लेबेनॉन इत्यादी देशातील आशयघन चित्रपटांबरोबरच मराठी चित्रपटाच्या वेगळ्या विभागांतर्गत मराठी चित्रपटांचा आस्वादही या महोत्सवात घेता येणार आहे.
या महोत्सवाची ऑनलाईन प्रवेश नोंदणी सुरु झाली असून रसिकांना www.affmumbai.org या वेबसाईटवर प्रवेश अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे. तसेच महोत्सवाचे डेलीगेट रजिस्ट्रेशन काउंटर १० डिसेंबरपासून रविंद्र नाट्यमंदिर इथे दुपारी १.०० ते ७.०० वाजेपर्यंत उघडण्यात येणार असून येथेही तुम्हाला प्रतिनिधी नोंदणी करता येईल.