रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा आज दुसरा दिवस आहे. आज रशियाकडून हल्ल्यांची तीव्रता लक्षणीय वाढली आहे. राजधानी कीव्हमध्ये सकाळी 7 मोठे स्फोट झाले. लोक रात्रभर घरे, भुयारी मार्ग आणि भूमिगत आश्रयस्थानांमध्ये लपले. खाण्यापिण्यापासून ते दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा तुटवडा आहे.रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनीही युद्ध संपण्याच्या आशा फेटाळून लावल्या आहेत. न्यूयॉर्क टाइम्सशी संभाषणात, लावरोव्ह म्हणाले- आम्ही यापुढे युक्रेनशी चर्चेची ऑफर स्वीकारणार नाही. युक्रेन आत्मसमर्पण करेल या एका अटीवरच वाटाघाटी होऊ शकतात. त्यांचे अध्यक्ष आतापर्यंत फक्त खोटे बोलले आहेत.
चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्पात वाढले रेडिएशन
गुरुवारी रात्री रशियन सैन्याने युक्रेनच्या चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्पाजवळ हल्ले केले. येथे अनेक स्फोटही झाले. त्यामुळे या अणुप्रकल्पातील किरणोत्सर्गाची पातळी वाढली आहे. युक्रेनच्या न्यूक्लियर एजन्सीने याला दुजोरा दिला आहे. किरणोत्सर्गाच्या वाढत्या पातळीमुळे या भागात राहणाऱ्या हजारो लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. त्यांना आरोग्याच्या समस्या देखील असू शकतात. दरम्यान, युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने नागरिकांना रशियाच्या लष्करी हालचालींची माहिती ठेवण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर त्यांच्यावर पेट्रोल बॉम्ब फेकले.
कीव्हमध्ये सकाळपासून सात मोठे स्फोट
युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये सकाळपासून सात मोठे स्फोट झाले आहेत. शहरावर एकामागून एक क्षेपणास्त्रे हल्ले होत असून लोक घरात लपून बसले आहेत. येथील महापौरांनी लोकांना घरातच थांबण्यास सांगितले आहे. युक्रेनने दावा केला आहे की, त्यांच्या सैन्याने 800 हून अधिक रशियन सैनिकांना ठार केले आहे. 30 रशियन रणगाडे आणि 7 गुप्तचर विमानेही नष्ट करण्यात आली आहेत.
दरम्यान, रशियाचे सैन्य राजधानीत घुसल्याचा दावा युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी केला आहे. रशियन रणगाडे येथून फक्त 32 किमी अंतरावर असून त्यांना रोखण्यासाठी युक्रेनच्या लष्कराने तीन पूल उडवून दिले आहेत. येत्या 96 तासांत म्हणजेच 4 दिवसांत कीव्ह रशियाच्या ताब्यात जाईल, अशी भीती झेलेन्स्की यांनी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की रशियन सैन्याने निवासी भागांना लक्ष्य केले असून त्यांनी रशियन नागरिकांना या युद्धाचा निषेध करण्याचे आवाहन केले आहे.
शुक्रवारी सकाळी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनीही एक निवेदन जारी केले. ते म्हणाले की, जगाने आपल्याला युद्धात लढण्यासाठी एकटे सोडले आहे. त्यांनी सांगितले की, ते कीव्हमध्ये आहेत आणि रशियन सैन्य तेथे दाखल झाले आहे. रशियाचे टार्गेट त्यांचे कुटुंब असल्याचेही त्यांनी सांगितले.
युक्रेनचे संपूर्ण सैन्य युद्धात उतरले
युक्रेन सरकारने 18 ते 60 वयोगटातील पुरुषांना देश सोडण्यास बंदी घातली आहे. युक्रेनने आपल्या 10,000 नागरिकांना लढाईसाठी रायफल दिल्याचे काही रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे.

