मानीव अभीहस्तांतरणविषयी शासकीय तरतुदी महत्त्व आणि फायदे याविषयी मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन
पुणे : सर्वसामान्य नागरिक कष्ट करून लाखो रुपयांचे फ्लॅट विकत घेते. परंतु अनेकदा बांधकाम व्यवसायिक स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी सोसायटीचे कन्व्हेयन्स करून देत नाही. यामुळे सोसायटीच्या जमिनीवर सभासदांना हक्क सांगता येत नाही त्यासाठी नागरिकांमध्ये सोसायटीच्या डीम्ड कन्व्हेयन्सबाबत जागरूकता होणे गरजेचे आहे, असे मत पुणे जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक स्नेहा जोशी यांनी व्यक्त केले.
मानीव अभीहस्तांतरण – शासकीय तरतूद,महत्व, फायदे आणि अडचणी या विषयावर सहकारी गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी आणि संचालकांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेमध्ये स्नेहा जोशी बोलत होत्या. कायदेशीर सल्लागार अॅड. अंजली कलंत्रे यावेळी उपस्थित होत्या.
स्नेहा जोशी म्हणाल्या, पुणे शहरामध्ये २० हजार सहकारी गृहरचना आहेत, परंतु त्यापैकी निम्म्याहून अधिक सोसायट्यांचे मानीव अभीहस्तांतरण झालेले नाही. लोकांमध्ये याबाबत जागृती झालेली नाही. यासाठी सरकारने शंभर दिवसांमध्ये १००० सोसायट्यांचे मानीव अभीहस्तांतरण करण्याची योजना राबवली आहे. नागरिकांनी या योजनेची माहिती घेऊन सोसायटीचे डीम्ड कन्व्हेयन्स करून घ्यावे आणि आपल्या सोसायटीच्या जमिनीचे स्वतःच मालक व्हावे, असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले
डीम्ड कन्व्हेयन्स करण्यासाठी प्रक्रिया सरकारने अतिशय सोपी केली आहे तसेच यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची संख्या ही कमी केली आहे, त्यामुळे नागरिकांना आपल्या सोसायटीचे डीम्ड कन्व्हेयन्स करण्यासाठी त्रास होणार नाही. सोसायटी रजिस्ट्रेशन झाल्यानंतर चार महिन्यांच्या आत डीम्ड कन्व्हेयन्स करून देणे बिल्डरला अनिवार्य असते, परंतु तसे जर बिल्डरने केले नाही तर सभासद एकत्र येऊन सोसायटीचे डीम्ड कन्व्हेयन्स करू शकतात, असेही अॅड. अंजली कलंत्रे यांनी यावेळी सांगितले.
अॅड. अंजली कलंत्रे म्हणाल्या, केवळ फ्लॅटचे अग्रीमेंट केले म्हणजे आपण मालक होत नाही, त्या सोसायटीच्या जागेचा मालकी हक्क आपल्याला मिळण्यासाठी सोसायटीने डीम्ड कन्व्हेयन्स करणे गरजेचे आहे. डीम्ड कन्व्हेयन्स केल्यानंतर सोसायटीला एफएसआय, टीडीआर तसेच पुनर्विकासासाठी ही फायदा होऊ शकतो. सोसायटीचे डीम्ड कन्व्हेयन्स झाले नसेल तर पुनर्विकास करता येत नाही. शिल्पा देशपांडे यांनी मान्यवरांशी संवाद साधला. प्रश्नोत्तराच्या माध्यमातून मान्यवरांनी कार्यक्रमानंतर उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले.