पुणे/राळेगण -केंद्र सरकारने आश्वासन दिले असल्याने अण्णा हजारे यांनी आंदोलन स्थगित केले. सरकारने त्यांना सहा महिन्यांची मुदत दिली आहे. तोपर्यंत काय निर्णय होतो, ते पाहू. जर हे प्रश्न समाधानकारक पद्धतीने मार्गी लागले नाहीत तर आम्हीच पुढाकार घेऊन आंदोलन उभे करु, असा इशारा जलसंपदा व शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिला.अण्णा हजारे यांनी उपोषण स्थगित केल्यानंतर बच्चू कडू यांनी त्यांची भेट घेतली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंबंधी त्यांनी हजारे यांच्याशी चर्चा केली.
स्वामीनाथन आयोगासह शेतकऱ्यांसंबंधी अन्य पंधरा मुद्द्यांवर सहा महिन्यांच्या आत उच्चाधिकार समितीच्या माध्यमातून निर्णय व्हावेत. अन्यथा सहा महिन्यानंतर पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना बरोबर घेऊन जनआंदोलन उभे केले जाईल, असा इशारा बच्चू कडू यांनी यावेळी माध्यमांशी संवाद साधताना दिला.
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शुक्रवारी रात्री उपोषण मागे घेतले. अण्णा हजारे ३० जानेवारीपासून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राळेगणसिध्दीत उपोषणास बसणार होते. दरम्यान, शुक्रवारी रात्री अण्णा हजारेंची केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी यांच्यासह भाजप नेत्यांनी राळेगणसिध्दीत भेट घेतली. केंद्राने अण्णांच्या मागण्यांसंदर्भात उच्चस्तरीय समिती तातडीने स्थापना करुन त्यात प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिल्यानंतर अण्णांनी उपोषण स्थगित केले.

