मुंबई – राज्यभरामध्ये सध्या ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत बऱ्याच गोष्टी पुन्हा सुरु करण्यात आल्या असल्या तरी लॉक डाऊन पूर्णपणे शिथिल करण्यात आला नाही. अशातच सध्या लागू असलेला लॉक डाऊनच्या पाचव्या टप्प्याची मुदत ३० जून रोजी पूर्ण होत आहे. याच पार्श्ववभूमीवर ३० जूननंतर लॉक डाऊन पूर्णपणे उठवला जाणार का ? असा प्रश्न विचारला जात आहे.
दरम्यान, राज्यातील जनतेच्या मनामध्ये घोंघावत असलेल्या या प्रश्नाला खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले असून त्यांनी, जर शिथीलता जीवघेणी ठरत आहे असं वाटलं तर आपल्याला पुन्हा लॉकडाउन करावा लागू शकतो असा इशारा दिला आहे. निसर्ग वादळामुळे फटका बसलेल्या कोकणासाठी मदत जाहीर करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी वक्तव्य केले.
नेमके काय म्हणाले मुख्यमंत्री ठाकरे
येत्या २२ तारखेपासून आपल्या विधिमंडळाचे जे अधिवेशन घेण्याचं योजलं होतं, त्या अधिवेशनाबद्दल कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. एकूणच परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर २२ तारखेला हे अधिवेशन घेता येणे कठीण आहे. २२ जूनला सुरु होणारे अधिवेशन हे ३ ऑगस्टला घेण्याचे ठरलेले आहे.
गेले २ महिने आपण कोरोनाविरुद्धची लढाई लढतो आहोत. आपण सर्वजण सोबत आहात. ज्या सूचना सरकार म्हणून नागरिकांना देण्याची आवश्यकता आहे, त्या देत असताना तुम्ही प्रसार माध्यमे फार महत्वाची भूमिका पार पाडत आहात, त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो.
चक्रीवादळाबद्दल, साधारणत: आम्ही सगळे तिकडे जाऊन आलो आहोत. नुकसान खूप झालेलं आहे. आम्ही आढावा घेतला, पंचनामे तर सुरू आहेत. पंचनामे झाल्यानंतर अधिक माहिती घेऊन त्याची भरपाई होईलच.
ज्यावेळी मी गेलो तेव्हा रायगड जिल्ह्यासाठी तत्काळ ₹ १०० कोटी त्यानंतर रत्नागिरीला ७५ कोटी आणि सिंधुदुर्गला २५ कोटींची मदत करण्यात आली. जे जे करणे शक्य आहे, ते करण्यात येईल. कोणालाही आम्ही उघडे पडू देणार नाही. ज्यांचं नुकसान झालं आहे, त्यांना महाविकास आघाडीचे सरकार खंबीरपणे साथ देईल.
सरकार अतिशय सावधतेने पावले टाकत आहे. जसं आपण लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने करत होतो, त्याचप्रमाणे शिथिलता आणताना टप्प्याटप्प्याने सगळं पूर्वपदावर आणावं लागेल. अजूनही संकट टळलेलं नाही, अजूनही लढा संपलेला नाही. पण कोरोनाबरोबर लढत असताना आपल्याला अर्थचक्र बंद करून चालणार नाही.
जे सरकारने सांगितले की सकाळी ५ पासून संध्याकाळी ७ पर्यंत तुम्ही मैदाने किंवा इतर ठिकाणी आपण फिरायला जाऊ शकता, व्यायामाला जाऊ शकता. पहिल्या दिवशी जी काही झुंबड उडाली, ती झुंबड बघितल्यानंतर थोडी घाबरुक वाटली. व्यायाम करायला आरोग्यासाठी सांगितले आहे, आरोग्य खराब करायला नाही.
सरकार परिस्थितीचा अंदाज घेत आहे.जर वाटल की ही शिथिलता जीवघेणी ठरू शकते तर नाईलाजाने आपल्याला पुन्हा लॉकडाऊन करावा लागेल. महाराष्ट्रातील जनता सहकार्य करणारी आहे, जनता सरकारचं ऐकत आहे. कारण त्यांना माहिती आहे की सरकार जे करत आहे, ते आपल्या हिताचं आहे. मी जनतेला सांगतो की गर्दी टाळा.
सर्व यंत्रणा पहिल्यापासून सज्ज होती. एक गोष्ट नक्की की जे विजेचे खांब उन्मळून पडले आहेत ते खांब उभारता येऊ शकतात, ते खांब उभारण्याचे काम सुरू आहे.पण वीजपुरवठा पुन्हा सुरू करण्यासाठी जी तांत्रिक टीम लागते, त्या टीम आम्ही इतर जिल्ह्यातून बोलावलेल्या आहेत आणि ते काम सुरू झालेलं आहे.