पुणे : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत गेल्या १२ तासात पाऊस झाला आहे. त्यामुळे पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडवासाला या चारही धरणाचा एकूण पाणीसाठा २.९६ टीएमसी एवढा झाला आहे.हा पाणी साठा २ जुलै रोजी २.५१ टीएमसी पर्यंत खाली आला होता. मात्र, गेल्या दोन ते दिवसापासून या चारही धरणात पावसाला सुरुवात झाली होती. तर सोमवारी रात्री नंतर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने रात्रीत शहराचे चार दिवसांचे पाणी वाढले आहे.
सोमवारी सायंकाळी हा पाणीसाठा २.७६ टीएमसी होता तो मंगळवारी सकाळी ०.२० ने वाढून २.९६टीएमसी झाला असल्याची पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली. तर या चारही धरणात अद्यापही पासून सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात ओढे, नाले तसेच आसपासच्या परिसरातून पाणी येत असल्याने हा साठा आणखी वाढेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सध्या गेल्या वर्षीच्या तुलनेत धरणांमध्ये ५.९४ टीएमसीने पाणीसाठा कमी आहे. मोसमी पाऊस सक्रिय झाल्यापासून या चार धरणांच्या परिसरात जोरदार पाऊस झालेला नाही. मात्र, गेल्या काही दिवसांपासून हलक्या स्वरूपाचा पाऊस धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असून दोन दिवसांपासून धरणांच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस हजेरी लावत आहे. सोमवारी सकाळी टेमघर धरण परिसरात ३५ मिलिमीटर, वरसगाव धरणाच्या क्षेत्रात १८ मि.मी. पानशेत धरण परिसरात १९ मि.मी., तर खडकवासला धरण परिसरात चार मि.मी. पावसाची नोंद झाली. दिवसभरात टेमघर धरणक्षेत्रात चार मि.मी., वरसगाव आणि पानशेत धरण परिसरात अनुक्रमे सात आणि सहा मि.मी., तर खडकवासला धरणक्षेत्रात दोन मि.मी. पाऊस पडला. त्यामुळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाणी होण्यास सुरुवात झाली आहे. रविवारच्या तुलनेत चारही धरणांमध्ये ०.१४ टीएमसी म्हणजेच ०.५० टक्क्यांनी पाणीसाठ्यात वाढ झाली आहे, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

