इंदू मिल येथे होणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जागतिक दर्जाच्या स्मारकाच्या कामासाठी शासन निधी कमी पडू देणार नाही. हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. चैत्यभूमी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.
उपमुख्यमंत्री म्हणाले, कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी होत आहे, ही अत्यंत आनंदाची बाब आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य अनमोल आहे. समाजाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी त्यांचे विचार लागू पडतात. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य जतन करून नव्या पिढीपर्यंत पोहोचावे यासाठी शासनदेखील प्रयत्नशील आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे आजच्या कार्यक्रमाला सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे उपस्थित राहू शकले नाहीत, त्यांनी स्वत: याबद्दल आपल्याकडे खंत व्यक्त केली. श्री.मुंडे यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. मुंबई येथील सिद्धार्थ महाविद्यालयाच्या बळकटीकरणासाठी 12 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगून सामाजिक न्याय विभागाच्या कोणत्याही योजनेसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी
महाराष्ट्र शासनाच्या वतीने चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली. भिक्खू संघास मुंबई महानगरपालिकेच्या वतीने चिवरदानाचे वितरण करण्यात आले. तसेच संगीत कला अकादमीतर्फे भीमगीतांचे सादरीकरण करण्यात आले.
चैत्यभूमी स्मारक येथे शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड, आमदार सर्वश्री नाना पटोले, भाई जगताप, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये, समाजकल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर आदी मान्यवरांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन केले.
मुंबई महापालिकेच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे, मान्यवरांनी या प्रदर्शन दालनास भेट दिली. या प्रदर्शनात मराठी व इंग्रजी कॉफी टेबल बुक विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. तसेच बार्टीतर्फे विविध योजनांच्या माहितीचा स्टॉलदेखील लावण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे निवेदन चारूशीला शिनई यांनी तर कार्यक्रमाचे व्यवस्थापन नागसेन कांबळे, चैत्यभूमीचे व्यवस्थापक प्रदीप कांबळे, अध्यक्ष सुनील बनसोडे यांनी पाहिले. आभार डॉ.भालचंद्र मुणगेकर यांनी मानले

