वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिराला लागून असलेल्या ज्ञानवापी मशीदीबद्दल न्यायालयाने हिंदू पक्षाच्या बाजूने दिलेल्या निकालानंतर ज्ञानवापी मशीद पुन्हा चर्चेत आली आहे. काशी विश्वनाथ मंदिर आणि ज्ञानवापी मशिदीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘शिवप्रताप गरुडझेप’ चित्रपटातील टीझरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हिंदूद्वेष्टा, धर्मांध राजा अशी ओळख असलेल्या औरंगजेबाने आपल्या अमानुष अत्याचाराने रयतेला घाबरून सोडले होते. या टीझरमध्ये औरंगजेब उत्तरेत हिंदू मंदिरे पाडताना आणि प्रजेवर अन्याय करताना दिसतो. “तेरा ईश्वर तो नही आया तुझें बचाने, कौन आएगा” असं म्हणताना दिसतो. त्यानंतर डॉ. अमोल कोल्हे यांची छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील दमदार एंट्री पहायला मिळते. “यापुढे आमच्या धर्मावर जो कोणी घाला घालेल त्याचे हात मुळासकट उखडून देण्याची धमक आम्ही बाळगतो..!” अशा कडक शब्दात छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला सुनावले. सह्याद्रीच्या ‘नरसिंहाची ही शिवगर्जना’ प्रदर्शित झालेल्या ‘शिवप्रताप गरुडझेप’च्या या टीझर मधून पहायला मिळते आहे.
सर्वांच्या अंगावर काटा आणणारा हा टीझर असून औरंगजेबाचा कपटी अवतार आणि छत्रपती महाराजांचा धैर्यशील बाणा यात पहायला मिळतो आहे. ‘शिवप्रताप गरुडझेप’ चित्रपटात डॉ. अमोल कोल्हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत तर अभिनेते यतीन कार्येकर क्रुर मुघलशासक औरंगजेबाची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहेत. या टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढवली आहे. विजयादशमीच्या मुहूर्तावर बुधवार ५ ऑक्टोबरला ‘शिवप्रताप गरुडझेप’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ‘जगदंब क्रिएशन’ प्रस्तुत करीत असलेल्या डॉ. अमोल रामसिंग कोल्हे निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन कार्तिक राजाराम केंढे यांनी केले आहे.
शिवचरित्रातील महत्त्वाचा अध्याय म्हणजे आग्रा भेट आणि औरंगजेबाच्या कैदेतून आग्र्याहून राजगडच्या दिशेने महाराजांनी केलेली कूच. १७ ऑगस्ट १६६६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज हे युवराज संभाजी महाराजांसह आग्र्याच्या किल्ल्यातून औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन यशस्वीरित्या पसार झाले. या संकटात महाराज किंचितही डगमगले नाहीत. रक्ताचा थेंबही न सांडता ते काही दिवसांनी आई जिजाऊंच्या चरणी सुखरूप राजगडावर पोचले
डॉ. अमोल रामसिंग कोल्हे, विलास सावंत, सोनाली घनश्याम राव, चंद्रशेखर ढवळीकर,कार्तिक राजाराम केंढे हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. प्रफुल्ल तावरे सहनिर्माते तर आहेत. रविंन्द्र मानकामे कार्यकारी निर्माते आहेत. छायाचित्रण संजय जाधव यांचे असून संकलन पीटर गुंड्रा यांचे आहे. संवाद डॉ.अमोल रामसिंग कोल्हे, युवराज पाटील यांनी लिहिले असून पटकथा डॉ. अमोल रामसिंग कोल्हे यांची आहे. गीतकार हृषिकेश परांजपे यांनी लिहिलेल्या गीतांना संगीतकार शशांक पोवार, रोहित नागभिडे यांचे संगीत लाभले आहे. पार्श्वसंगीत शशांक पोवार यांचे आहे. क्रिएटिव्ह कन्सल्टंट प्रशांत खेडेकर तर क्रिएटिव्ह सुपरवायझरची जबाबदारी कीर्ती डे घटक यांनी सांभाळली आहे. कला दिग्दर्शक महेश गुरुनाथ कुडाळकर आहेत. साहसदृश्ये रवी दिवाण तर वेशभूषा मानसी अत्तरदे यांची आहे. नृत्य दिग्दर्शन दिपाली विचारे यांनी केलं आहे. रंगभूषा राहुल सुरते तर केशभूषा जयश्री नाईक यांची आहे. निर्मिती व्यवस्थापन क्रिएटिंग पिक्चर्सचे आहे.