मुंबई-काल ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे दोन जहाज मुंबईपासून 175 किलोमीटर अंतरावर असलेल्या ‘हीरा ऑईल फील्ड्स’जवळ भरकटले होते. आज यातील पी-305 नावाचे जहाज बुडाल्याचे वृत्त आहे. या जहाजावर 273 लोकं होती. यातील 140 जणांना वाचवण्यात यश आले असून, 170 जण अजूनही बेपत्ता आहेत. त्यांना वाचवण्यासाठी नेवीने INS कोच्ची आणि INS तलवारला पाठवले आहे.
दरम्यान, दुसरे एक जहाजही समुद्रात अडकले आहे. त्या जहाजाला वाचवण्यासाठी INS कोलकाताला पाठवण्यात आले आहे. त्या जहाजावर 137 जण असून, आतापर्यंत 38 जणांना वाचवण्यात आले आहे.
भारतीय नौसेनेचे प्रवक्ते कमांडर विवेक मधवाल म्हणाले की, ‘मुंबई हाय परिसरात असलेल्या हीरा ऑईल फील्ड जवळ अडकलेल्या ‘पी-305’ जहाजाच्या मदतीसाठी INS कोच्चीला पाठवण्यात आले आहे. INS तलवारदेखील शोध आणि बचावकार्यासाठी तैनात आहे. तसेच, GAL नावाचे दुसरे एक जहाज अडकल्याची माहिती मिळाली होती. त्या जहाजावर 137 जण अडकले आहेत. ते जहाज मुंबईपासून आठ नॉटिकल मैल अंतरावर आहे. त्याच्या मदतीसाठी INS कोलकाताला रवाना केले आहे. यातील 38 जणांना वाचवण्यात आले आहे.
सोमनाथजवळ समुद्रात 5 बोटी अडकल्या
सोमनाथजवळ पाच बोटी अडकल्याची माहिती मिळाली असून बचावकार्य सुरू आहे. वादळाचा परिणाम आज दुपारी 12 वाजेपर्यंत राहू शकतो.
कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र आणि गोवा राज्यांमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर सोमवारी रात्री तौक्ते चक्रीवादळ गुजरातला पोहोचले. यामुळे अनेक भागांत वीजपुरवठा ठप्प झाला आहे. झाडे उन्मळून पडली आहेत. चक्रीवादळ दीवला स्पर्श करून उना येथून भावनगरला पोहोचले आहे. भावनगरात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे.
भावनगरमध्ये अनेक ठिकाणी झाडे पडल्याची नोंद झाली आहे. त्याचबरोबर वादळामुळे गीर सोमनाथ जिल्ह्यातही वादळाचे तांडव पाहण्यास मिळाले आहे

