Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

गद्दारीचा शिक्का या जन्मी पुसता येणार नाही;महिषासूर मर्दीनी हा खोकासूर मारेल-उद्धव ठाकरेंचे एकनाथ शिंदेंवर घणाघात

Date:

मुंबई-

‘होय,तुम्ही गद्दार, गद्दारच म्हणणार. मंत्रिपदे काही काळापर्यंत राहतील, पण कपाळावरला गद्दारीचा शिक्का या जन्मी पुसता येणार नाही. स्वत:च्या वडिलांच्या नावाने मते मागण्याची हिंमत नाही. दुसऱ्याचा बाप चोरणारी अवलाद आहे ही. अरे आपल्या वडिलांना तरी घाबरा. तुम्हाला २० वर्षांनी दिघे आठवले का ?, ते एकनिष्ठ होते.’भगव्यातच गेले.. तुम्ही खोकासुर आहात तुम्हाला मुख्यमंत्री पद पाहिजे , शिवाजी पार्क हि पाहिजे ,पक्षप्रमुख पद हि पाहिजे ,बाळासाहेब हि चोरायचे त्यांची शिवसेनाही चोरून न्यायची असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथील दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटावर केला. आणि आपली सभा पुन्हा गाजविली .

महागाई आठवू द्यायची नसल्याने भाजपचे गायी, हिंदुत्वाचा डोस सुरू आहे. सध्या देश हुकूमशाही कडे चालला आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केली. गृहमंत्री अमित शहा हे प्रत्येक राज्यात जातात. काड्या करतात आणि सरकार पाडतात. मात्र, तुम्ही साथ द्या. तुम्हाला पुन्हा सरकार आणून दाखवेन, असा निर्धारही उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

ठाकरे म्हणाले, एकाअर्थी झाले, ते बरे झाले. फक्त तुम्ही साथ द्या. पुन्हा सरकार आणून दाखवतो. बरे झाले. बांडगुळे गेले. ती बांडगूळ सेना म्हणा, असे कोणी तरी मला म्हणाले. मात्र, तो बांडगुळ गट आहे. माझ्या मनात विश्वास आहे. ज्या महिषासूर मर्दीनीने महिषासूर मारला. ती महिषासूर मर्दीनी हा खोकासूर मारेल, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. ठाकरेंच्या भाषणानंतर शिवाजी पार्कवर रावण दहन करण्यात आले. भाजपचे स्क्रिप्ट न घेता भाषण करून दाखवावे. तुम्ही आमच्या पत्रकार परिषद ऐकल्या. आम्ही मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री पत्रकार परिषदा घ्यायचो. कधीही अजित पवारांनी माझ्यासमोरचा माइक ओढला नाही. आम्ही सोबत असताना भाजपने औरंगाबादचे संभाजीनगर केले नाही. उस्मानाबादचे धाराशिव केले नाही. मात्र, आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत असताना ते करून दाखवले.

देशातील लोकशाही राहते की नाही, हा गंभीर प्रश्न आहे. तुम्हाला सगळ्यांना सावधानतेचा इशारा देतोय. सगळे पक्ष संपणार आणि एकच पक्ष राहणार म्हणजे देश हुकूमशाहीकडे चालला आहे. ही गुलामगिरी तुम्हाला चालणार आहे का?, हिंदुत्व म्हणजे नेमके काय. तथाकथित हिंदुत्ववाद्यांनी एकाच व्यासपीठावर यावे आणि सांगावे. शिवसेनाप्रमुखांनी अनेकदा सांगितले की या देशावर प्रेम करणारा मुसलमान असला, तरी तो आमचा. प्रत्येकाने आपला धर्म घरात ठेवावा. घराबाहेर पडल्यानंतर देश हाच धर्म म्हणावा. मात्र, बाहेर येऊन कुणी मस्ती दाखवत असेल, तर आम्ही खरे हिंदुत्व दाखवू. पाकिस्तासमोर, चीनसमोर जाऊन शेपट्या घालायच्या. इकडे येऊन पंजा दाखवायचा ही तुमची मर्दुमकी. इकडे येऊन प्रकल्प पळवतायत. आम्हाला गुजरातबद्दल आसूया नाही. मात्र,मोठे प्रकल्प गुजरातमध्ये नेणे ही कितपत योग्य आहे?

अमित शहा आम्हाला जमीन दाखवाच : अमित शहाजी आम्हाला जमीन दाखवाच. पाकिस्तानने बळकावलेली आमची जमीन एक इंच आणून दाखवा. मोदींच्या त्या मुलाखती आम्ही आजही ऐकतो. पाकला त्याच्याच भाषेत उत्तर देऊ. मात्र, पाकव्याप्त काश्मीरची एक इंचही जमीन तुम्ही घेऊ शकला नाहीत.

ज्यांना जबाबदारी दिली ते कटप्पा कट करत होते
गद्दारच म्हणार, मंत्रिपद काही काळ पण गद्दारीचा शिक्का नेहमीच तुमच्या कपाळावर असणारच. शिवसेनेचे काय होणार मला चिंता नव्हती. ही गर्दी बघितली तर आता प्रश्न गद्दारांचे कसे होणार. रावण दहन होईल, या वेळी रावण वेगळा कालानुरूप तोही बदलतो वाईट इतकच मी रुग्णालयात असताना ज्यांना जबाबदारी दिली ते कटप्पा ते कट करत होते.

सुषमा अंधारे, भास्कर जाधव यांनी गाजवली ठाकरेंची सभा

– शिवाजी पार्कवरील उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यात बुधवारी उद्धव ठाकरे यांच्या भाषणापूर्वी शिवसैनिकांनी सर्वाधिक प्रतिसाद दिला, तो शिवसेनेत नव्याने आलेल्या सुषमा अंधारे यांना आणि नव्याने शिवसेना नेतेपदाची धुरा दिलेल्या भास्कर जाधव यांना.तर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट हल्लाबोल केला. ‘मुंबई महापालिकेची चौकशी करण्याच्या धमक्या फडणवीस देत आहेत. पण नागपूर महापालिकेत पाणीपुरवठा करण्याचे कंत्राट ओसीडब्ल्यू नावाच्या एका भाजपशी संबंधित व्यक्तीच्या कंपनीला देण्यात आले. या कंपनीने ८० कोटींची थकबाकी असल्याचे सांगत काम थांबवले असून, त्यांना हे पैसे देण्याची लगबग सरकारकडून सुरू आहे,’ असा आरोप देसाई यांनी केला. नागपूरमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था करण्यासाठी कंत्राटी बस घेतल्या असून, त्यालाही १०० कोटी देण्याचे ठरत असून, यात कुणाचा फायदा होणार आहे, असा प्रश्न देसाई यांनी फडणवीस यांच्या रोखाने दसरा मेळाव्यात उपस्थित केला.

सुषमा अंधारे यांनी आपल्या भषाणातून नारायण राणे, रामदास कदम, किरीट सोमय्या आदी नेत्यांवर आपल्या आक्रमक शैलीत हल्ला चढवला. सुषमा अंधारे म्हणाल्या की, उद्धव ठाकरे यांच्या हिंदुत्वावर टीका करणाऱ्यांनी हिंदू धर्मातील कोणत्या ग्रंथात दुसऱ्या धर्माचा द्वेष करावा हे सांगितले आहे हे सांगावे, असे आव्हान आपण शिंदे गटाला देत आहोत. मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, अनेक मुस्लिम आज शिवसेनेच्या भूमिकेच्या जवळ येत असल्यामुळेच अनेकांना त्रास होत आहे, असेही अंधारे म्हणाल्या.

उद्धव ठाकरे हे काँग्रेससोबत गेल्यामुळे नारायण राणे त्यांच्यावर टीका करत आहेत. मात्र, याच सोनिया गांधींच्या पायावर दहा वर्षे लोळण घेत आमदार, खासदार, मंत्रिपदे मिळवली त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करावी, हे हास्यास्पद आहे,’ अशा शब्दांत अंधारे यांनी नारायण राणे यांच्याकडून होत असलेल्या टीकेचा समाचार घेतला. किरण पावसकर यांच्यावरही जोरदार टीका करताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, इतरांचे जाऊद्या पण किरण पावसकर यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करावी आणि तीही काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेले म्हणून? हे किरण पावसकर अजित पवार यांनी विधान परिषेदेचे चॉकलेट दिल्यामुळे कालपर्यंत राष्ट्रवादीतच होते. आज ते उद्धव ठाकरेंना शिवसेनेबद्दल शिकवत आहेत, याला काय म्हणावे?

सुषमा अंधारे यांनी भाषणावेळी शिवसैनिकांना उद्देशून गळ्यातील भगवे उपरणे फिरवायला सांगितल्यावर संपूर्ण शिवाजी पार्कातील शिवसैनिकांनी ही उपरणी फिरवायला सुरुवात केली.भास्कर जाधव यांनीही राणे यांच्यावर जोरदार टीका केली. ‘राणे यांना बाळासाहेबांनी मोठे केले, तरी अजूनही हे शिपाईच राहिले,’ असे जाधव म्हणाले. तसेच ज्या धनुष्यबाणावर निवडून आले, तेच चिन्ह गोठवण्यासाठी शिंदे गट प्रयत्न करतो आहे हे दुर्दैवी आहे, असेही जाधव म्हणाले. ‘काँग्रेससोबत गेलो ही टीका करणाऱ्या शिंदे गटाच्या लोकांना आपल्याला एकच गोष्ट सांगायची आहे, की काँग्रेसनेही मतभेद असताना कधीही दसरा मेळाव्याला शिवतीर्थ नाकारण्याचे पाप केले नव्हते. मात्र, हे पाप शिंदे गटाच्या लोकांनी केले हे सच्चा शिवसैनिक कधीही विसरणार नाही,’ असे जाधव म्हणाले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सज्ज आहे – प्रशांत जगताप

पुणे- होणार… होणार.. म्हणता म्हणता पुणे महानगरपालिकेची निवडणूक अखेर...

महायुतीतून पुण्या पिंपरीत अजितदादा कशासाठी बाहेर ? मविआला धोबीपछाड करण्यासाठी ?

पुणे- महापालिका निवडणुका जाहीर होताच आज पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र...

पुणे महापालिका निवडणुकीसाठी कॉंग्रेसच्या समन्वय समिती प्रमुखपदी रमेश बागवे

पुणे- येथील महानगरपालिका निवडणुकीसाठी समन्वय समिती गठीत...

इनव्हेलियर इंडिया व राष्ट्रवादी कामगार युनियनमध्ये वेतन करार

पुणे — रांजणगाव येथील इनव्हेलियर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि...