मुंबई-राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार आगामी सहा महिन्यांत कोसळण्याची शक्यता आहे, असे भाकीत करत नेते आणि कार्यकर्त्यांनी मध्यावधी निवडणुकीसाठी तयार राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी सायंकाळी केले.
पक्षाचे आमदार आणि इतर नेत्यांना संबोधित करताना ते बोलत होते. राष्ट्रवादीच्या एका नेत्याने पवार यांच्या भाषणाचा संदर्भ देत सांगितले की, ‘शिंदे यांना पाठिंबा देणारे अनेक बंडखोर आमदार सध्याच्या परिस्थितीवरून नाराज आहेत. एकदा का मंत्रिमंडळाचे खातेवाटप झाले की, त्यांच्यातील नाराजी बाहेर येईल. त्याची परिणती सरकार कोसळण्यात होईल. राज्यातील हा नवा प्रयोग अयशस्वी ठरेल आणि त्यामुळे अनेक बंडखोर आमदार त्यांच्या मूळ पक्षात परत जातील.
आता आपल्या हातात फक्त सहा महिने आहेत, त्यामुळे पक्षाच्या आमदारांनी आपापल्या विधानसभा मतदारसंघांत जास्तीत जास्त वेळ राहावे.’ शिवसेनेच्या ३९ आमदारांनी पक्ष नेतृत्वाविरोधात बंड पुकारल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार पडले होते. त्यानंतर शिंदेंचे सरकार स्थापन झाले आहे.