एमआयटीत यूपीएससीच्या यशस्वितांचा १३वा राष्ट्रीय पातळीवर सत्कार संपन्न
पुणे, १३ ऑगस्टः“ संपूर्ण जग हे जागतिक खेडे बनले आहे. अशावेळेस मानवतेला प्राथमिकता देऊन त्यांच्या कल्याणासाठी कार्य करावे. ग्रामीण क्षेत्राच्या उन्नतीसाठी प्रशासकीय सेवेत खूप काही करण्यासारखे आहे. समाजातील शेवट्या व्यक्तीचा विकास कसा होईल हे ध्यानात ठेऊनच कार्य करावे.”असे मत आयएफएस (सेवा निवृत्त) भारताचे मुख्य माहिती आयुक्त यशवर्धन कुमार सिन्हा यांनी मांडले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ पब्लिक पॉलिसी, पुणेतर्फे कोथरूड येथील स्वामी विवेकानंद सभामंडप येथे आयोजित करण्यात आलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) स्पर्धा परीक्षा २०२०-२१ मध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचा १३वा राष्ट्रीय पातळीवरील सत्कार सोहळ्यांच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
राज्यसभेचे माजी महासचिव व राज्यसभा सचिवालयाचे सल्लागार डॉ. पी. पी.के. रामचार्युलू, (निवृत्त आयपीएस), भारताच्या गृहमंत्रालयाच्या नॅशनल क्राईम ब्युरोचे संचालक रामफाल पवार व केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या माजी अध्यक्ष व प्रख्यात वकील श्रीमती मंजुला दास हे प्रमुख सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते.
यावेळी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, कुलगुरू डॉ.आर.एम.चिटणीस, प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, प्र कुलगुरू डॉ. तपण पांडे, स्कूल ऑफ पब्लिक पॉलिसीच्या अधिष्ठाता प्रा.डॉ. शालिनी शर्मा, स्कूल ऑफ सस्टेनेबल स्टडिजच्या संचालिका प्रा.अनामिका बिश्वास, डॉ. के. गिरीसन आणि डॉ. प्रसाद खांडेकर उपस्थित होते.
या सोहळ्यात देशातून तिसरी आलेली गामिनी सिंगला ५१ हजार रूपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले. त्याच बरोबर ५५ यशस्वितांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. शाल, मानपत्र असे सत्काराचे स्वरूप होते.
यशवर्धन कुमार सिन्हा म्हणाले,“ सार्वजनिक सेवा ही एक विशेष सेवा असून ती समाज आणि देशाच्या विकासासाठी असावी. प्रशासकीय सेवेत कार्य करताना परिश्रमावर विश्वास ठेवा. समाजातील अडचणी आणि आव्हानांना सतत तोंड देत रहातो तेच यशस्वी होतात. नागरी सेवांमध्ये प्रवेश करण्याचा आपला हेतू कधीही विसूर नका. प्रत्येक सेवमध्ये प्रचंड आव्हाने आहेत. आपण लोकांच्या जीवनात बदल आणत आहोत. या क्षेत्रात राहूण आव्हानांचा सामना करावा. ”
रामफाल पवार म्हणाले, “प्रशासकीय सेवेत कठोर परिश्रम घ्यावे लागतात. सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन कार्य करण्याची आवश्यकता आहे. लोकसेवेसाठी जास्तित जास्त वेळ देणे गरजेचे आहे. आपण जसा व्यवहार करू तशीच परतफेड समाजाकडून मिळेल. स्वातंत्र्यानंतर ही या देशात दर वर्षी १ कोटी ३५ लाख लोकांना अटक केली जाते. जे मानवतेच्या विरोधात आहे. कोर्टाच्या सूचनेनंतरच अटक केली जावी. त्याच प्रमाणे या देशात सायबर सुरक्षा आणि ट्रॉफिक मॅनेजमेंट या दोन गोष्टीवर खूप मोठ्या प्रमाणात कार्य होणे गरजेचे आहे. रस्त्यांवर मोटरसायकलसाठी वेगळी लेन बनविण्याची पॉलिसी तयार करावी.”
डॉ. पी. पी.के. रामचार्युलू म्हणाले ,“ सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनासाठी युवकांची उर्जा महत्वाची आहे. समाजाच्या व देशाच्या प्रगतीसाठी योग्य ध्येय धोरणे बनवूण त्यावर अंमलबजावणी करावी. देशात भ्रष्ट्राचार हा नवीन नाही. कौटिल्याने सुद्धा याचा उल्लेख केलेला आढळतो. भ्रष्टाचाराला मुळापासून नष्ट करण्यासाठी कार्य करावे. समाजात सतत समस्या राहतीलच अशावेळेस प्रशासकीय सेवेतील त्रुटींना ओळखून त्यावर कार्य करावे. प्रामाणिकता आणि पारदर्शीकतेने कार्य केल्यास देशाचा विकास होईल.”
डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“ विद्यार्थ्यांनी शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त, मानसिकदृष्ट्या सतर्क, बौद्धिकदृष्ट्या तीक्ष्ण आणि अध्यात्मिक दृष्ट्या उन्नत असावे. करियर आणि जीवनाचे तत्वाज्ञान हे वेगवेगळे असते. त्याचे संतुलन ठेवून आपल्या जीवनाची प्रगती करावी. जीवनामध्ये शिस्त आणि चारित्र्य महत्वाचे असते. मानवता आणि सहिष्णूता हा संदेश लक्षात ठेऊन प्रशासकीय कार्य करावे.”
मंजुला दास म्हणाल्या,“लोकशाहीला सशक्त करण्यासाठी तुमची सेवा महत्वाची आहे. सर्वप्रथम भ्रष्टाचार संपवण्यासाठी सर्वांना जोमाने कार्य करावे लागणार आहे. राष्ट्र प्रगतीसाठी मानव सेवा हा महत्वाचा घटक आहे. राजकीय स्तरावर कार्य करून चांगले प्रशासन आणण्याची जवाबदारी आता सर्वांच्या खांद्यावर आहे.”
राहुल कराड म्हणाले,“ समाजात जागृती घडवून आणण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. समाज परिर्वनात शिक्षण व्यवस्था सर्वोत्कृष्ट भूमिका पार करू शकते. डब्ल्यूपीयूमध्ये पारदर्शीकता असून येथे शिक्षणाबरोबरच सामाजिकतेला महत्व दिले आहे. वर्तमानकाळात सर्वांना वसाहतवादी मानसिकता बदल्यण्याची गरज असून इंंडियाला भारत असे संबोधिल्यास आत्मसम्मान वाढेल.”
दामिनी सिंगला म्हणाल्या,“ आम्हाला काय करावयाचे आहे प्रथम ठरवा. शिक्षण, कुटुंबाची पार्श्वभूमी या गोष्टी महत्वाच्या नाही तर कठोर परिश्रम गरजेचे आहे. हार्ड वर्कपेक्षा स्मार्ट वर्क गरजेचे आहे. आपण जे स्वप्न पाहतो त्यासाठी सतत प्रयत्न करत रहा. वर्तमानकाळात मुलींनी आर्थिक गोष्टींनी सशक्त बनण्यासाठी सतत शिकत रहावे.”
प्रा.डॉ. शालिनी शर्मा यांनी प्रास्ताविक केले. डॉ.आर.एम.चिटणीस यांनी स्वागतपर भाषण केले.
प्रा.डॉ. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. के. गिरीसन यांनी आभार मानले.