पुणे : “समाजाची चांगली जडण-घडण घडवण्यासाठी प्रत्येकाने निर्मळ योगदान देणे गरजेचे आहे. जगातील जात-पात, रंग भेद बाजूला ठेवून प्रत्येकाच्या आतमध्ये दडलेला चांगुलपणा बाहेर आला पाहिजे. चांगुलपणाची चळवळ छोट्या स्वरूपाची असली तरी संपूर्ण जगाला एक देश बनवण्याची शक्ती यामध्ये आहे.” असे प्रतिपादन संकल्प ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे मानसोपचारतज्ञ डॉ. पी एन कदम यांनी केले.
चांगुलपणाची चळवळ संस्थेतर्फे या संस्थेचे अध्यक्ष आणि माजी प्रशासकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या वाढदिवसानिमित्त सलग बारा तास फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून व्याख्यान पर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात विविध क्षेत्रातील 64 मान्यवरांनी विविध विषयावर मार्गदर्शन करत ज्ञानेश्वर मुळे यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन यशवंत शितोळे आणि प्रणोती शितोळे यांनी केले. डॉ. मुळे यांनी आभार मानले.
डॉ. कदम म्हणाले, चांगुलपणाची चळवळ देशव्यापी झाली असून ज्ञानेश्वर मुळे यांचे मार्गदर्शन तरूण पिढीला प्रेरणादायी आहे. मुळे हे उत्तम व आदर्शवत असे हे व्यक्तिमत्व सर्वांना सकारात्मक ऊर्जा देणारे आहे. सर्वांना प्रोत्साहन देण्याबरोबरच सर्वांशी आपुलकीने वागणारे असे आहे. मुळे यांनी चांगुलपणाची चळवळ ही संस्था उभारून प्रभावी समाजपरिवर्तनाच्या सकारात्मक कृतिशील उपक्रमाची वाट दाखवून दिली.
माजी प्रशासकीय अधिकारी ज्ञानेश्वर मुळे म्हणाले, “चांगुलपणा म्हणजे सध्या नेभळटपणा असा समज समाजामध्ये झाला आहे. कारण चांगला माणूस हतबल असतो ज्या बाजूने खेचला जाईल त्या बाजूने ढकलला जातो. ही अशी अवस्था कोणावर ही येऊ नये. म्हणूनच चांगुलपणाच्या चळवळीचे वैशिष्ट्य म्हणजे सर्वजन हिताय सर्वजन सुखाय होय. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी समाजपरिवर्तनाची चळवळ पुढे नेऊया सुंदर सार्थक समाज बनवूया. एका अर्थाने समाजाच्या शुद्धीकरणाची छोटी का असेना पण फार महत्वाची मोहीम हाती घेतलेले आहे. सामान्य माणसाची शक्ती प्रबळ असते. त्यामुळे तिचा उपयोग समाजासाठी झाला पाहिजे.

