लर्निग लिंक्स फाऊंडेशन व मास्टरकार्ड यांच्यातर्फे १०९० महिलांना उद्योजकता, आर्थिक-डिजिटल साक्षरता प्रशिक्षण
पुणे : “महिलांना संधी मिळाली, तर त्याचे त्या सोने करतात. सचोटी, प्रामाणिकता, कष्टाची तयारी यामुळे त्यांच्यात उद्योजिका होण्याची क्षमता असते. योग्य संधी आणि पाठिंबा मिळाला, तर महिला उद्योगातही यशस्वी होते. लर्निंग लिंक्स फाउंडेशन आणि मास्टरकार्ड यांच्या पुढाकारातून १२५ महिलांचे बिझनेस प्लॅन निवडण्यात आले, ही आनंदाची गोष्ट आहे,” असे मत राज्यसभा खासदार ऍड. वंदना चव्हाण यांनी व्यक्त केले.
‘महिला उद्योजकता व तंत्रज्ञान’ प्रकल्पांतर्गत पुणे जिल्ह्यातील १०९० महिलांना लर्निग लिंक्स फाऊंडेशन व मास्टरकार्ड यांच्यातर्फे आर्थिक साक्षरता, डिजिटल साक्षरता व मार्केटिंग, उद्योजकता व बिझनेस प्लॅन या विषयांचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यातील १२५ महिलांच्या उद्योगांना मान्यता देण्यात आली. तर १२ महिलांना अनुदानाचा धनादेश सुपूर्त करण्यात आला. प्रसंगी ‘वी अँड टेक पुणे’ यात महिलांनी केलेल्या कामाची चित्रफीत दाखवण्यात आली.
बाणेर रस्त्यावरील यशदा येथे झालेल्या कार्यक्रमावेळी सिंहगड इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंटचे संचालक डॉ. डॅनीयल पेनकर, लर्निग लिंक फाउंडेशनचे व्यवस्थापकीय सल्लागार महम्मद अमीर अजीज, फाउंडेशनच्या लीड कन्सल्टंट स्वाती दुधाले आदी उपस्थित होते. वंदना चव्हाण यांच्या हस्ते हेमलता गायकवाड, उज्वला नांदे, सुजाता शिंदे, नीलम सोनवणे, कौसर सय्यद, उज्ज्वला दिखले, मनीषा कालेकर, रंजना उमाप, स्वाती ताम्हाणे, नेहा शिंदे, साक्षी, सानिया सय्यद अशा १२ महिलांना धनादेश व प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
वंदना चव्हाण म्हणाल्या, “तुम्ही सगळ्या महिला भाग्यवान आहेत. लर्निग लिंक्स फाऊंडेशनने तुम्हाला व्यासपीठ मिळवून दिले आहे. आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने करणे आपल्या हातात आहे. कष्ट केल्याशिवाय काही मिळत नाही. त्यामुळे आज मिळालेल्या ५,००० रुपयांचे ५०,००० कसे होतील, यावर आपण काम केले पाहिजे. स्माईल फाउंडेशन तुमच्या मदतीसाठी तत्पर आहे. ध्येय निश्चित करून व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करा. हे करताना आरोग्याकडेही लक्ष द्या.”
डॉ. डॅनीअल पेनकर म्हणाले, “महिलांमध्ये अपरिमित शक्ती असते. अनेकदा पुरुषांना जमत नाही, तेही काम महिला करून दाखवतात. त्यांच्यातील क्षमता ओळखून त्यांना प्रोत्साहन द्यायला हवे. लर्निंग लिंक्स फाउंडेशनसारख्या संस्था महिलांना उभा करण्याचे काम करत आहेत. सकारात्मक विचार, निर्णयक्षमता असेल, तर तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. ३६५ दिवस महिला दिन साजरा होईल, असे महिलांचे कर्तृत्व आहे.”
महम्मद अमीर अजीज म्हणाले, “लर्निग लिंक्स फाऊंडेशन ही २० वर्ष जुनी संस्था आहे. प्रत्येकाला नवीन काहीतरी शिकायला मिळावे हाच फॉउंडेशनचा उद्देश आहे. आज देशात केवळ १३ टक्के महिला उद्योगात आहेत. हे प्रमाण वाढवण्यासाठी महिला उद्योग प्रशिक्षण व अनुदान देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनीता धर्माराव यांनी केले. स्वाती दुधाले यांनी आभार मानले.

