ए. के. इंटरनॅशनलतर्फे येत्या ३१ जानेवारीला एका नव्या ख्रिस्तोपदेश (ग़ॉस्पेल) भक्तिगीताचे विमोचन होणार आहे. ‘प्रभू बढे और मै घटु’ असे शीर्षक शब्द असलेले हे गीत प्रसिद्ध पार्श्वगायिका बेला शेंडे यांनी सुमधुर आवाजात गायले आहे. श्रवणीय संगीतमेळाने युक्त असे हे प्रार्थनागीत ‘ग्लोरिफाय ख्राईस्ट ६’ने सादर केलेले यंदाच्या वर्षीचे ध्येयगीत (रिझोल्यूशन साँग ऑफ २०२१) आहे. “प्रभू ख्रिस्ताने वाढावे आणि मी घटत जावे असा त्याचा भावार्थ आहे. पवित्र बायबलमधील जॉन ३:३०या चरणात उल्लेखलेल्या शब्दांची प्रेरणा त्यामागे आहे” असे ख्रिस्तोपदेश गीतकार डॉ. अमित कामले यांनी स्पष्ट केले आहे. ए. के. या लोकप्रिय नामाभिधानाने ओळखले जाणारे डॉ. अमित कामले हे ‘ए. के. इंटरनॅशनल टुरिझम’चे संचालक तथा ‘ग्लोरिफाय ख्राईस्ट’चे संस्थापक असून या गीताची संकल्पना, लेखन व संगीत संयोजन त्यांचीच आहे.
हे गीत येत्या ३१ जानेवारी २०२१ रोजी जगभर प्रसारित होणार आहे. योगायोगाने हा दिवस डॉ. अमित यांची कन्या अद्विता (वय ९) हिचा वाढदिवसही आहे. अद्विताने लहान वयात आपले ‘याहोवा’ हे पहिले भक्तीगीत हृदयापासून तळमळीने गायले असून ते गेल्या वर्षी प्रसारित झाले. अद्विताला या सांगितिक प्रतिभेची देणगी स्वाभाविकच तिच्या वडिलांकडून मिळाली आहे. पण त्याहून उल्लेखनीय म्हणजे या लहान मुलीने ज्या आत्मविश्वासाने आणि भावमाधुर्याने हे भक्तिगीत गायले आहे ते खरोखर कौतुकास्पद आहे.
डॉ. अमित कामले यांनी लिहीलेल्या लोकप्रिय ख्रिस्तोपदेश भक्तिगीतांमध्ये दिल मेरा दिल (गायक – शान), तू ही है (गायिका – शिरीन जॉर्ज), याहोवा (गायिका – अद्विता कामले), तेरी महिमा (गायिका – कीर्ती सगाथिया), तेरे बिना येशू (गायक – देव नेगी), पिता के अनुग्रह से (गायक – हरिहरन), मेरा भारत (गायक – कॅमेरॉन मेंडीझ), जीवन का मक्सद (गायक – कुमार सानू), तेरा अनुग्रह मेरे लिये काफी (गायक – सुदेश भोसले), कलाम (गायक – अभय जोधपूरकर), तू ही धन्य होगा (गायक – विजय प्रकाश), आत्मा का फल (गायिका – दिव्या कुमार), प्रार्थना (गायक – ॲश किंग), समय (गायक – विजय बेनेडिक्ट) आदींचा समावेश आहे. डॉ. अमित कामले यांचे ‘गॉस्पेल कलेक्शन ऑफ पॉलाइन एपिस्टल्स’ आणि ‘गॉस्पेल कलेक्शन ऑफ साम्स’ हे गीतसंग्रहही श्रोत्यांमध्ये प्रिय आहेत.
‘ग्लोरिफाय ख्राईस्ट’ने वर्ष २०१६ मध्ये स्थापना झाल्यापासून ए. के. इंटरनॅशनल टुरिझमच्या छत्राखाली आजवर ५० ख्रिस्तोपदेश भक्तीगीतांची निर्मिती केली असून ही गीते हिंदी, मराठी, तमीळ, तेलुगू, मल्याळम, बंगाली, पंजाबी, आसामी, खासी, नगामी या भाषांत आहेत. ‘ग्लोरिफाय ख्राईस्ट’ ही ‘ए. के. इंटरनॅशनल टुरिझम’ची संपूर्णपणे विनानफा तत्त्वावर चालवली जाणारी शाखा आहे. ‘ए. के. इंटरनॅशनल टुरिझम’ ही इस्राईल, जॉर्डन व इजिप्त या देशांत पवित्र भूमी सहली आयोजित करण्यात विशेष नैपुण्य प्राप्त केलेली पर्यटन संस्था असून ख्रिस्तोपदेश संगीताच्या माध्यमातून प्रभू येशूच्या शिकवणीचा सर्वदूर प्रचार करण्याचा उपक्रम राबवत आहे.
डॉ. अमित कामले यांचे व्यक्तीमत्त्व बहुपैलू आहे. ते डॉक्टर, उद्योजक, शिक्षणतज्ज्ञ, सल्लागार, समाजहितैषी, जगप्रवासी, मार्गदर्शक, कल्पक दिग्दर्शक, पटकथा लेखक, संगीत निर्माते, गीतकार व संगीत दिग्दर्शक या भूमिका समर्थपणे पार पाडत आहेत. ते म्हणाले की, “ग्लोरिफाय ख्राईस्ट हे जगभरच्या ख्रिस्तोपदेश संगीतासाठीचे व्यासपीठ आहे. आम्ही प्रार्थना गीतांच्या निर्मितीला प्राधान्य देतो पण त्याचबरोबर प्रार्थना संगम, सुफी, गझल, रॉक, पॉप, समकालीन व इतर प्रकारांतील गीतेही निर्माण करतो. सध्या मात्र आम्ही बायबलमधील चरणांवर आधारित गीत निर्मितीवर लक्ष केंद्रित केले आहे.”

