पुणे, ता. २० : कोविडमुळे जागतिक पुरवठा साखळ्या असुरक्षित झाल्यानंतर, आता तरी पुनर्वापरयोग्य, पर्यावरणपूरक चक्रीय अर्थव्यवस्थेचा गांभीर्याने विचार केला पाहिजे, असे मत कॅम अविडाचे व्यवस्थापकीय संचालक एम. कृष्णा यांनी व्यक्त केले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अण्ड रीसर्चच्या (आयएमडीआर) वतीने ‘चक्रीय अर्थव्यवस्था’ या विषयावर आयोजित केलेल्या दोन दिवसांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्धाटन करताना कृष्णा बोलत होते. डीर्इएसच्या नियामक मंडळ आणि परिषदेचे उपाध्यक्ष महेश आठवले, आयएमडीआरच्या संचालिका डॉ. शिखा जैन यांची प्रमुख उपस्थिती होती.
कृष्णा पुढे म्हणाले, चक्रीय ‘अर्थव्यवस्था पर्यावरणाचा समतोल साधणारी, शाश्वत, लवचिक, आरोग्याची दखल घेणारी स्थानिक स्तरांचा वापर करणारी आणि भारतीय जीवनशैलीशी साधर्म्य असणारी आहे. उत्पादन आणि सेवा निर्माण करण्यासाठी लागणार्या सामग्रीचे प्रमाण कमी केले पाहिजे. संसाधनांचा वापर दीर्घ काळ कसा करता येर्इल याचा विचार केला पाहिजे. ज्यामुळे उत्पादनांचे प्रमाण वाढण्यास मदत होईल.’
वेल्थ मॅनेजमेंट इंडियाचे संचालक भारत पाठक यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगता समारंभ झाला. त्यांनी स्टार्ट अप साठी आवश्यक मूल्य, मूल्य निर्मिती आणि मूल्यांकन या गोष्टींचे महत्त्व स्पष्ट केले. परिषदेत २० प्रबंध सादर करण्यात आले. डॉ. संवेदी राणे यांचा पेपर सर्वोत्कृष्ट ठरला. श्रृती हिरे, रविंद्र जोशी आणि प्रणय खोब्रागडे यांनी बिझनेस प्लॅन स्पर्धेत अनुक्रमे तीन क्रमांक मिळाले.

