- एमआयटी डब्ल्यूपीयूत भगवान महावीर आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी मानवतावादी विश्वधर्माचा संकल्प सोडला.
पुणे दि. १४ एप्रिलः जैन धर्माचे संस्थापक भगवान वर्धमान महावीर आणि प्रबुद्धनायक महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती एकाच दिवशी येण्याचा सुवर्णयोग जुळून आला आहे. या दोन्ही महामानवांनी विश्वधर्म, मानवकल्याण आणि जातिभेदाच्या भिंती ओलांडून संपूर्ण मानवजातीला एकत्र करण्याचे महत्कार्य केले आहे. आज मानवतावादी विश्वधर्माचे आरचण करण्याची गरज आहे. असे उद्गार एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे, भारतचे संस्थापक-अध्यक्ष विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी काढले.
भगवान वर्धमान महावीर आणि प्रबुद्धनायक महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या वतीने साजरी केली.
याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्रकार प्रा. रतनलाल सोनग्रा, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरु डॉ. रविकुमार चिटणीस, कवि डॉ. संजय उपाध्ये, विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख प्रा. विनोद जाधव, प्रा. दत्ता दंडगे, प्रा. विक्रांत गायकवाड व गिरीश दाते उपस्थित होते.
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, गेल्या चार दशकांपासून विविध कार्यांच्या माध्यमातून मानवतावादी विश्वधर्माची स्थापना व्हावी याकरीता आम्ही प्रयत्न करीत आहोत. तीर्थक्षेत्रांकडून ज्ञानतीर्थक्षेत्रांकडे हा एकमेवाद्वितीय असा उपक्रम, विश्वधर्मी श्रीराम-रहीम मानवता सेतू, तथागत भगवान गौतम बुद्ध विहार आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृति भवन, श्रीमद् भगवत्गीता ज्ञानभवन आणि तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर – श्री तुकाराम महाराज यांच्या नांवाने उभारण्यात आलेला मानवी इतिहासातील जगातील सर्वात मोठा घुमट या सर्व उपक्रमांमधून ही विश्वधर्माची संकल्पना प्रभावीपणे जगासमोर मांडण्याचा प्रयत्न करीत आहोत.
भारताचे थोर सुपुत्र स्वामी विवेकानंद यांच्या ‘विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातूनच जगात सुख, समाधान आणि शांती नांदेल’ यावर विश्वास ठेऊन ‘मूल्याधिष्ठित वैश्विक शिक्षण पद्धती’चा प्रसार, आधुनिक शिक्षणपद्धतीला पूरक असे, मन आणि आत्मा यांच्यावर भर देऊन त्यांचाही देह आणि बुद्धी इतकाच विकास साधण्याची गरज आहे
प्रा. रतनलाल सोनाग्रा म्हणाले, अहिंसा आणि शांतीचा संदेश देणारे भगवान महावीर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा हा संदेश मानवजातीला दिला आहे. डॉ. आंबेडकर हे दलिताचे नेते न राहता ते सर्व सामान्यांचे कैवारी बनले. त्यांनी विश्वधर्माचा संदेश पसरविला.
या प्रसंगी तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पुतळ्याच्या साक्षीने तसेच जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या स्मृतीला वंदन करून, प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन सर्व उपस्थितांनी ‘मानवतावादी विश्वधर्माच्या’ स्थापनेसाठी कार्य करण्याची प्रतिज्ञा केली.

