Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

कार्यकर्त्यांना बळ देणारा ‘राष्ट्रवादी’ (लेखक :प्रशांत जगताप,शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पुणे)

Date:

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज, म्हणजे १० जून रोजी २३ वा वर्धापनदिन आहे. कोणतीही संघटना, राजकीय पक्ष किंवा संघटनेचा वर्धापनदिन हा त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी अभिमानाचा क्षण असतो. त्याचबरोबर आतापर्यंतच्या वाटचालीचे सिंहावलोकन करत पुढील प्रवासाचा निर्धार करण्याचा क्षण असतो. त्यामुळेच, देशातील पाचव्या क्रमांकाचा राष्ट्रीय पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचा हा वर्धापनदिन माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांसाठी उर भरून आणणारा दिवस आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला आज देश पातळीवर असणारी ओळख सहजासहजी मिळालेली नाही. पक्षाचे संस्थापक, अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची अफाट मेहनत, दूरदृष्टी आणि आपल्या विचारांवर ठाम असणारी कार्यपद्धती या सर्वांचा हा मिलाप म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आहे. या पक्षाचे वैशिष्ट्य म्हणजे या पक्षात कार्यकर्त्यांना बळ मिळते. हायकमांड किंवा पक्षश्रेष्ठींच्या दरबारात असण्यापेक्षा प्रत्यक्ष जमिनीवर किती काम करता आणि सामान्य जनतेशी तुमची किती नाळ जुळलेली आहे, अशा कार्यकर्त्यांना न्याय देणारा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडे पाहिले जाते.

पक्षाच्या या वर्धापनदिनाचा विचार करताना, पूर्ण २३ वर्षांचा काळ आम्हा सर्व कार्यकर्त्यांच्या डोळ्यांसमोरून जातो. पक्षाची स्थापना १० जून १९९९ रोजी झाली. त्यानंतर तीन-चार महिन्यांमध्येच पक्षाला विधानसभा-लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जावे लागले. तत्कालीन राजकारण आणि भाजप-शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या विचारातून शरद पवार साहेबांनी काँग्रेसबरोबर हातमिळवणी केली. पवार साहेबांच्या राज्यातील लोकप्रियतेची चुणूक पहिल्याच निवडणुकीत देशाने पाहिली होती. त्यामुळे, तरुणांचा ओढा राष्ट्रवादी काँग्रेसकडे होता. अशा तरुणांच्या मनामध्ये गोंधळ निर्माण करण्यासाठी, त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसपासून दूर ठेवण्यासाठी माध्यमांमध्ये बातम्या पेरल्या जात होत्या. कधी राष्ट्रवादी काँग्रेस भाजपबरोबर जाणार, तर कधी काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणार, अशा बातम्या सारख्या येत होत्या. पण, पक्षाच्या राज्यातील वाटचालीवर त्याचा कोणताच परिणाम झाला नाही. उलट, २००४च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस राज्यातील पहिल्या क्रमांकाचा पक्ष म्हणून उदयाला आला.

हा विस्तार फक्त राज्यापुरता मर्यादित नव्हता, तर वेगवेगळ्या राज्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार-खासदार निवडून येत गेले. आतापर्यंत ११ राज्यांमध्ये पक्षाच्या चिन्हावर आमदार निवडून गेले आहेत. आजही, पक्षाचे पाच खासदार आहेत. त्यातील चार महाराष्ट्रातील आहेत, तर पाचवा खासदार लक्षद्वीप येथून निवडून आला आहे. पवार साहेबांची विकासाची दूरदृष्टी आणि सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा विचार यांच्या बळावर या पक्षाचा पाया रचला गेला. हा पाया एवढा मजबूत आहे, की अनेक आव्हाने आल्यानंतरही पक्ष भक्कमपणे उभा आहे. पवार साहेबांच्या आतापर्यंतच्या वाटचालीत अनेक स्थित्यंतरे आली. मात्र, राजकारणामध्ये ते कायमच लक्षवेधी ठरले. त्यामुळेच, पवार साहेबांना लक्ष्य करायचे, त्यांच्यावर जहरी टीका करायची हा एककलमी कार्यक्रम विरोधी पक्षांकडून राबवला जातो. मात्र, वयाच्या ८२व्या वर्षीही पवार साहेब अशा सर्वांना पुरून उरले आहेत आणि देशाच्या राजकारणात एका दीपस्तंभाप्रमाणे उभे आहेत. सत्ता असो वा नसो, आपण पक्ष चालवू शकतो, वेगळ्या पद्धतीने जनतेच्या उपयोगी पडू शकतो, हे पवार साहेबांनी वेळोवेळी दाखवून दिले आहे.

एखाद्या भागाचा किंवा शहराचा विचार करताना, विकास कसा करायचा आणि पुढील ५० वर्षांचा विचार करायचा, ही गोष्ट पवार साहेबांनी सर्वांना शिकवली. त्यामुळेच, पुणेकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसला कायम साथ दिली. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निवडून येत गेले, सलग १० वर्षे महापालिकेची सत्ता पक्षाकडे होती. पवार साहेबांचा विचार आणि आदरणीय अजितदादा पवार यांचे नेतृत्व यातून विकासाला कशी दिशा मिळते, हे पुणेकरांनी अनुभवले आहे. त्याचबरोबर राज्यात महिलांसाठी चळवळ उभी करणाऱ्या संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांचे नेतृत्वही पुण्याने पाहिले आहे. त्यामुळेच, पक्षावर येथील जनतेने कायम विश्वास ठेवला. महिलांना सर्वाधिक संधी देणारा पक्ष म्हणूनही राष्ट्रवादी काँग्रेसकडे पाहिले जाऊ शकते. नगरसेविका म्हणून, महापौर, स्थायी समितीचे अध्यक्ष, खासदार अशा अनेक पदांवर पक्षाने महिलांना संधी दिली आहे. देशातील पाचव्या-सहाव्या क्रमांकाचे शहर म्हणून पुण्याकडे पाहिले जाते. अशा पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष म्हणून माननीय खासदार वंदनाताई चव्हाण यांनी दीर्घकाळ काम केले. शहरातील अनेक पदांवर महिलांनी काम केले आहे. शहराचा विकास होत असताना आणि वाटचालीला आकार येत असताना, या महिलांना थेट निर्णयाची संधी देण्याचे काम आमच्या पक्षाने केले आहे, हे सांगताना निश्चितच आम्हाला अभिमान वाटतो. पूर्वीच्या काँग्रेसमध्ये अनेकांना सत्तेची खुर्ची पाहता आली नव्हती. अशा असंख्य कार्यकर्त्यांनाही नगरसेवक, महापौर, आमदार होता आले, हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्मितीचे यश आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे वैशिष्ट्य म्हणजे येथे कार्यकर्त्यांना मिळणारा मान. इतर पक्षांच्या तुलनेमध्ये आमच्या पक्षात हायकमांडकडे कधीच चकरा माराव्या लागत नाहीत. खऱ्या अर्थाने लोकशाही जिवंत ठेवणारा हा पक्ष आहे. माझ्यासारख्या अगणित कार्यकर्त्यांना राजकीय पार्श्वभूमी नसतानाही, तरुण वयामध्येच अनेक महत्त्वाच्या पदांवर संधी दिली. अशा पद्धतीने पक्ष वाढवताना कार्यकर्त्यांची राजकीय कारकीर्द घडवणारा पक्ष हीच राष्ट्रवादी काँग्रेसची खरी ताकद आहे. ही ताकद काय असते, याचा अनुभव संपूर्ण राज्याने २०१९च्या विधानसभा निवडणुकीमध्ये घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस संपवायची असेल, तर पवार साहेबांना लक्ष्य करायचे, यासाठी विरोधी पक्ष झपाटले होते. त्यामुळे, त्यांनी जानेवारी ते नोव्हेंबर २०१९ या काळामध्ये पक्षातील अनेक नेत्यांना, आमदार-खासदारांना गळाला लावले होते. आता मोठे नेते ओढून घेतले, तर राष्ट्रवादी काही उरली नाही, असा त्यांचा हस्तिदंती मनोऱ्यातील अंदाज होता. विविध सर्वेक्षण संस्थांनीही राष्ट्रवादी २०-२२ आमदारांपुरती उरणार असा निष्कर्ष काढला होता. प्रत्यक्षात ८० वर्षांचा योद्धा रणभूमीवर उतरला होता. त्यांनी कार्यकर्त्यांना हाक दिली आणि शहरा-शहरांमधून तरुणांची फौज त्यांच्यामागे उभी राहिली. त्यांच्या बळावर राष्ट्रवादी काँग्रेसने ५४ आमदार निवडून आणले. सोलापूरसारख्या शहरामध्ये अचानक पवारसाहेबांच्या रॅलीला आलेले हजारो तरुण कोण होते, साताऱ्यातील सभेचा ऐतिहासिक पावसातील फोटो भरल्या डोळ्याने सोशल मीडियावर टाकून विचार पोहोचवणारे विशीतील हात कोणाचे होते, असे असंख्य प्रश्न ज्यांच्या मनामध्ये आहेत, त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसची २३ वर्षांची वाटचाल पाहावी लागेल. या पक्षाने कधीही जातीय-धार्मिक किंवा कोणत्या अस्मितेचे राजकारण केले नाही. अन्य राज्यांमध्ये या अस्मितेच्या राजकारणामुळे सत्ता मिळवणारे पक्ष असतानाही, पवार साहेबांनी हा सोपा मार्ग टाळला. कठोर मेहनत, आत्मविश्वास, संघटनात्मक बांधणी यातून कायम तरुणांना दिशा देण्याचे काम केले. त्यामुळेच, विरोधकांनी घेरलेले असताना, कणाकणांतून तरुण कार्यकर्ते गोळा झाले आणि २०१९मध्ये पक्षाने राजकारणाला कलाटणी देणारी कामगिरी केली. पुढील वर्षी राष्ट्रवादी काँग्रेस २५व्या वर्षात पदार्पण करणार आहे, एक कार्यकर्ता म्हणून आम्हा सर्वांना हा क्षण डोळ्यामध्ये साठवायचा आहे. अतिशय संघर्षातून राष्ट्रवादी काँग्रेसने आणलेले हे सोनेरी दिवस पुणेकर आणि राज्यातील जनता विसरणार नाही, असा विश्वास आम्हाला निश्चितच आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सज्ज आहे – प्रशांत जगताप

पुणे- होणार… होणार.. म्हणता म्हणता पुणे महानगरपालिकेची निवडणूक अखेर...

महायुतीतून पुण्या पिंपरीत अजितदादा कशासाठी बाहेर ? मविआला धोबीपछाड करण्यासाठी ?

पुणे- महापालिका निवडणुका जाहीर होताच आज पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र...

पुणे महापालिका निवडणुकीसाठी कॉंग्रेसच्या समन्वय समिती प्रमुखपदी रमेश बागवे

पुणे- येथील महानगरपालिका निवडणुकीसाठी समन्वय समिती गठीत...

इनव्हेलियर इंडिया व राष्ट्रवादी कामगार युनियनमध्ये वेतन करार

पुणे — रांजणगाव येथील इनव्हेलियर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि...