पुणे : मांगल्याचे प्रतिक असणारी गुढी उभारून दिलेला आरोग्यविषयक सामाजिक संदेश… वाचाल तर वाचाल असे सांगत विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग असलेली पुस्तक दिंडी….पारंपरिक वेशात सहभागी झालेली तरुणाई आणि आरोग्यरक्षणाची गुढी घेऊन सामाजिक संदेश देणारे कार्यकर्ते अशा उत्साही वातावरणात सण करु साजरे, माध्यम जरा वेगळे हे ब्रीद जपणा-या तरुणाईने गुढीपाडव्यानिमित्त पुस्तक दिंडी काढली. गुढीपाडव्याच्या परंपरेला सामाजिकतेची जोड देत आरोग्य रक्षणाचा संदेश देऊन मैत्र युवा फाऊंडेशनने गुढीपाडवा उत्साहात साजरा केला.
मैत्र युवा फाऊंडेशन तर्फे गुढी आरोग्याची, गुढी परंपरेची, गुढी साहित्याची, गुढी मांगल्याची, गुढी संस्काराची असा संदेश देत बाजीराव रस्त्यावरील आचार्य अत्रे सभागृहा समोर पुस्तक दिंडीचे आयोजन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ.न.म.जोशी, संतसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे, अभिनेता सौरभ गोखले, खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरि बहिरट, ढोल-ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर, अर्चना क्षीरसागर, तेजस्वी सेवेकरी, डॉ.सचिन वानखेडे, चिंतामणी पटवर्धन, रमेश राठिवडेकर, फाऊंडेशनचे अध्यक्ष संकेत देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते. उपक्रमाचे यंदा १२ वे वर्ष होते.
डॉ.न.म.जोशी म्हणाले, संगणक व मोबाईलच्या युगात माणसाच्या एकमेकांशी होणा-या भेटी दूर झाल्या आहेत. मात्र, अशा उपक्रमांतून तरुणांनी एकत्र यावे, भारतीय संस्कृती व संतसाहित्याचे जतन करावे, ही स्तुत्य बाब आहे. आपल्यापेक्षा दुस-यासाठी काहीतरी केले, तरच राष्ट्रउभारणी होते. त्यामुळे तरुणांनी असे कार्य सातत्याने करायला हवे.
डॉ.रामचंद्र देखणे म्हणाले, कोणताही उपक्रम सुरु होणे, ही प्रतिष्ठा असते आणि तो उपक्रम सातत्याने सुरु ठेवणे ही त्याविषयीची निष्ठा असते. माणसातील हरविलेला संवाद पुन्हा जीवंत करण्याचे काम असे उपक्रम करतात. त्यामुळे गुढीपाडवा हा आनंद, ज्ञान, सहजीवन, तत्व जपणारा सण असल्याचे त्यांनी सांगितले.
पुस्तक दिंडीच्या माध्यमातून तरुणाईने दिला आरोग्यरक्षणाचा संदेश
Date:

