पुण्यातील हडपसर येथील सिरम इन्स्टिटय़ूट कंपनीच्या मागील बाजूस असलेल्या गोसावी वस्ती येथील मोकळ्या जागेत आज सकाळी मॉर्निंग वॉक गेलेल्या व्यक्तीवर बिबट्याचा हल्ला झाल्याची घटना घडली आहे.या घटनेमुळे हडपसर परिसरात एकच खळबळ उडाली होती.मात्र अखेर आज रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घटना स्थळापासुन 100 मीटरच्या अंतरावर बिबट्याला पकडण्यात वन विभागाच्या अधिकाऱ्यांना यश आले आहे.
आज रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास तेथूनच शभर मीटरवर भर वस्तीतील दोन घरांच्या बोळीत वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना आढळून आला. 2 तासाच्या अथक परिश्रमपूर्वक कौशल्याने गनच्या साह्याने भूलीचे इंजेक्शन देण्यात आले. वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी, रेस्क्यू टीम व पोलिस अधिकारी तसेच कर्मचारी चोहोबाजूंनी जाळी लावुन पकड़ले
कात्रजची रेस्क्यू टीम नऊ वाजता याठिकाणी येऊन बिबट्याला पकडण्यासाठी आली होती.वस्तीतील सचिन आटोळे व विश्वास गायकवाड या दोघांच्या घरामधील बोळीत बिबट्या बसलेला आढळला.
वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी, रेस्क्यू टीम व पोलिस अधिकारी, कर्मचारी तसेच स्थानिक तरूणांच्या सहकार्याने रेस्क्यू टीमने चोहोबाजूंनी जाळी लावण्याचे काम करून बिबट्याला गनच्या साह्याने तीन इंजेक्शन मारून बेशुध्द केले. त्यानंतर बिबट्याला जेरबंद करून ओढून बाहेर काढले. बोळी अतिशय अरूंद असल्याने टीमला मोठी कसरत करावी लागली. बघ्यांची यावेळी मोठी गर्दी झाली होती.
उपवनसंरक्षक राहुल पाटील व सहाय्यक वनसंरक्षक अशुतोस शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी मुकेश सणस, वनपरिमंडल अधिकारी एम. व्ही सपकाळे, समीर इंगळे, वनरक्षक मधुकर गोडगे, बी. एम. वायकर, एस. बी. गायकवाड, ए. आर. गायकवाड, गणेश म्हस्के, सुभाष झुरंगे, रेस्क्यू टीमचे समन्वयक अनुज खैरे यांनी संपूर्ण परिसराची पाहणी करून माहिती घेतली होती. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसह हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी येथे दिवसभर पोलिस बंदोबस्त लावला होता.
वनपरिक्षेत्र अधिकारी मुकेश सणस म्हणाले,”पकडलेला बिबट्या सुमारे दोन वर्षे वयाचा आहे. त्याचे वजन पंचावन्न ते साठ किलोपर्यंत आहे. सध्या त्याला कात्रज प्राणी संग्रहालयात पाठविण्यात आले आहे.’

