मुंबई-कोणत्याही पक्षाचा अध्यक्ष हा विधिमंडळ पक्षाचा नेता निवडू शकत नाही,तो बहुमताने निवडला जातो. तो असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. तसेच, आजच्या बहुमत चाचणीत आम्ही बहुमतापेक्षाही अधिक मते मिळवून आजची चाचणी सहज जिंकू, असा विश्वासही फडणवीसांनी व्यक्त केला.विधानसभा अध्यक्षपदी निवड होताच राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी आणि मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांची नियुक्ती रद्द केल्याचे पत्र रविवारी रात्री उशिरा काढले. पत्रानुसार, एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे गटनेते, तर भरत गोगावले हे प्रतोद असल्याचे सांगण्यात आले आहे. या निर्णयाचे देवेंद्र फडणवीस यांनी समर्थन केले आहे.
फडणवीस म्हणाले, शिवसेनेच्या 16 आमदारांना त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षांनी दिलेली मान्यता योग्य नव्हती. कायद्यात या संदर्भातील व्याख्या अगदी स्पष्ट आहे. त्यानुसार अशी मान्यता पक्षाच्या अध्यक्षांना देता येत नाही. यासंदर्भात अधिक स्पष्टीकरण देताना फडणवीस म्हणाले, सध्या भाजपकडे 106 आमदार आहेत. यातील 20 आमदार वेगळे झाले आणि मला पक्षनेतेपदावरून हटवावे, अशी आमदारांची इच्छा झाली किंवा तसे त्यांनी केले, तर ते शक्य होणार नाही. कारण विधिमंडळ पक्षाचा नेता बहुमताने निवडला जातो.
शिवसेनेच्या 16 आमदारांच्या पात्रतेवर प्रश्न
आज बहुमतासाठी शिंदे गटाकडून शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यासह 16 आमदारांना व्हीप बजावणार असल्याचे कळते. या आमदारांनी व्हीप पाळला नाही तर त्यांची आमदारकी रद्द करण्याची प्रक्रिया शिंदे गट करू शकतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार आणि महाराष्ट्र भाजपच्या आमदारांची रविवारी रात्री मुंबईतील एका हॉटेलमध्ये बैठक झाली. त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही सहभागी झाले होते. त्यावर आजच्या रणनितीबाबत चर्चा झाल्याचे समजते.