विद्युत मंडळ अधिकारी संघटनेचे अधिवेशन उत्साहात
पुणे, दि. २८ फेब्रुवारी २०२२: जोपर्यंत वीज कंपन्यांकडून अधिकृत भूमिका जाहीर होत नाही तोपर्यंत कर्मचाऱ्यांनी कोणत्याही प्रकारच्या वावड्यांवर विश्वास ठेऊ नये. वीज कंपन्यांतील सर्व कर्मचाऱ्यांच्या हिताला बाधा येणार नाही याची व्यवस्थापनाकडून पूर्ण काळजी घेतली जात आहे अशी ग्वाही महापारेषण कंपनीचे संचालक (मानव संसाधन) श्री. सुगत गमरे यांनी दिली.
पुणे येथील बालेवाडी शिवछत्रपती क्रीडा संकुलामध्ये शनिवारी व रविवारी (दि. २६ व २७) महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ अधिकारी संघटनेचे ४४ वे राज्यस्तरीय वार्षिक अधिवेशन उत्साहात झाले. संघटनेचे महावितरण, महापारेषण व महानिर्मिती व सुत्रधारी कंपनी अंतर्गत वित्त व लेखा, मानव संसाधन, माहिती व तंत्रज्ञान, औद्योगिक संबंध, जनसंपर्क, विधी, सुरक्षा व अंमलबजावणी आदी विभागातील राज्यभरातील पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या अधिवेशनाच्या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संचालक श्री. सुगत गमरे बोलत होते. महानिर्मितीचे संचालक (वित्त) श्री. बाबासाहेब थिटे यांच्याहस्ते या अधिवेशनाचे उद्घाटन झाले. यावेळी व्यासपीठावर महावितरणचे प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. अंकुश नाळे, संघटनेचे अध्यक्ष श्री. सुनील पाठक, पतसंस्थेचे अध्यक्ष श्री. सतीश तळणीकर, मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. भरत पाटील (महापारेषण), सहमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. ललीत गायकवाड (महावितरण), संघटनेचे सरचिटणीस श्री. मनोज ठवरे, संघटन सचिव श्री. संजय खाडे, पुणे परिमंडल कार्याध्यक्ष श्री. विजय गुळदगड आदींची उपस्थिती होती.
या दोन दिवसीय अधिवेशनात कंपनी व संघटनेसमोरील वाटचाल व आव्हाने, प्रस्तावित धोरणे व कायदे आदींवर विचारमंथन झाले. तसेच संघटनेच्या ध्येयधोरणांसंदर्भात ठराव मांडून चर्चा करण्यात आली. या अधिवेशनाच्या आयोजनासाठी केंद्रीय सल्लागार श्री. गुलाबराव मानेकर, पुणे-बारामती परिमंडलाचे अध्यक्ष श्री. संजय चव्हाण, कार्याध्यक्ष श्री. विजय गुळदगड, सचिव श्री. सतीश फडतरे तसेच विविध आयोजन समित्या, पदाधिकारी व सदस्यांनी परीश्रम घेतले.

